पिंपरी : राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे स्पष्ट झाले असल्याने, या दोन्ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. पुण्यातील किडनी प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

किवळे येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आरोग्य भरती संदर्भात पोलिसांचा सविस्तर अहवाल अपेक्षित आहे. ड वर्गाची प्रश्नपत्रिका दूरपर्यंत प्रसारित झालेली होती, असे उघड झाले आहे. त्याची पुनर्परीक्षा घेण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करत आहोत. क वर्गाच्या प्रश्नपत्रिकेबाबतही अशीच परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास सुरू असून अद्याप ते निष्कर्षापर्यंत आलेले नाहीत. या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी समक्ष चर्चा केली असता, पुन्हा सगळी परीक्षा घेतलेली बरी, अशा निष्कर्षापर्यंत तेही आले आहेत. त्यामुळे या दोन्ही परीक्षा लवकरच घेऊन भरतीप्रक्रिया पूर्ण केली जाईल. नामांकित संस्थांकडून ऑनलाइन पद्धतीने ही भरती करावी, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. याबाबतचे आदेश संबंधित विभागाकडून निर्गमित होतील. त्यानंतर लगेचच या परीक्षेसंदर्भातील कार्यवाही पूर्ण करू.
पुण्यातील किडनी प्रकरणाविषयी बोलताना टोपे म्हणाले, उच्च न्यायालयाने रुग्णालयावरील कारवाईला स्थगिती दिलेली आहे. याविषयी सुनावणी सुरू आहे. त्यासाठी आणखी आठ दिवस लागणार आहेत. न्यायालयाकडून आम्ही आठ दिवस मागून घेतले आहेत. या कालावधीत सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. पैशासाठी अवयव विकणे हे अतिशय निंदनीय आहे. अशा गोष्टींना प्रोत्साहन मिळता कामा नये. यात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
हळूहळू करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या भागातील ही संख्या दिसते. थोडी रुग्णसंख्या वाढली तरी सौम्य आजाराप्रमाणे त्याचे स्वरूप राहील, अगदीच भीतिदायक असणार नाही. अशापद्धतीचा निष्कर्ष काढता येतो. त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. सरकार रुग्णसंख्येवर लक्ष ठेवून आहे. त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना केल्या जातील.
‘राजकारण आणि टीआरपी वाढवण्याचे काम’
अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयाच्या एमआरआय कक्षात छायाचित्र काढण्यात आले, असा प्रकार आपण यापूर्वी कधी पाहिला किंवा ऐकला नाही. या संदर्भात जे काही झाले, ते चुकीचेच आहे. ‘टीआरपी’ वाढण्याचे काम कोणी करू नये. कोणी आजारी असल्यास अशाप्रकारे जाहीरपणे सांगण्याची काहीही आवश्यकता नाही. अशा विषयात कोणी राजकारण करू नये. ही पद्धत चुकीची आहे. या प्रकाराची नक्कीच चौकशी झाली पाहिजे, असे राजेश टोपे म्हणाले..