केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडून पाहणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : मांजरी येथील भारत बायोटेक कंपनीच्या प्रकल्पातून करोना प्रतिबंधक लशींची निर्मिती करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या (द सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कण्ट्रोल ऑर्गनायझेशन) पथकाकडून पाहणी करण्यात आली असून येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. उत्पादन सुरू झाल्यावर पाण्याची आवश्यकता भासणार असल्याने कंपनीकडून आणखी पाण्याची मागणी करण्यात आली आहे.

या कंपनीमध्ये उत्पादनाची रंगीत तालीम झाली आहे. करोना प्रतिबंधक लशींचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यापूर्वी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आणि राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकांकडून नुकतीच पाहणी करण्यात आली आहे.  याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘या कंपनीमध्ये लशींच्या निर्मितीसाठी आवश्यक ती तयारी झाली आहे.  प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाल्यावर पाण्याची गरज भासणार आहे. पुणे महापालिकेने दररोज सात ते आठ टँकरने पाणीपुरवठा करण्याची सूचना यापूर्वी देण्यात आली आहे.वीजपुरवठा, पर्यावरणविषयक परवानगी, जागेचे हस्तांतरण, करारनामे आदी प्रशासकीय पातळीवरील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. कंपनीकडून मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची तयारी पूर्ण झाली आहे. कंपनीतून सुमारे साडेसात कोटी लशींचे उत्पादन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष उत्पादन सुरू होऊ शकणार आहे.’

भारत बायोटेक कंपनीतून करोना प्रतिबंधक लशींच्या निर्मितीची तयारी पूर्ण झाली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आणि राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकांकडून पाहणी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यापूर्वी अंतिम मान्यतेसाठी कंपनीकडून अर्जही करण्यात आला आहे. तसेच पाण्याची आणखी मागणी करण्यात आली असून, पाणीपुरवठा करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत.

– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readiness vaccine production bharat biotech project ysh
First published on: 19-01-2022 at 01:30 IST