पुणे : युद्धाच्या काळात घर खरेदी करावे की टाळावे, असा प्रश्न उपस्थित होतो. गेल्या वर्षीपासून गृहनिर्माण क्षेत्राला घरघर लागली आहे. यंदाही घरांच्या विक्रीतील घसरण कायम राहिली आहे.
केवळ पुण्याचा विचार करता फेब्रुवारी महिन्यात घरांच्या विक्रीत १८ टक्के घट नोंदविण्यात आली. विशेष म्हणजे, युद्ध सुरू होण्याआधीच्या काळातील ही खराब कामगिरी आहे. आता युद्ध सुरू झाल्यानंतर बांधकाम साहित्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरांच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात घरांचे व्यवहार आणखी घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नाईट फ्रँक इंडियाने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात घरांचे १९ हजार २५ व्यवहार झाले होते आणि त्यातून ७१३ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क संकलन झाले होते. यंदा फेब्रुवारीत घरांचे १५ हजार ५७९ व्यवहार झाले असून, ७०८ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले.
घरांचे सर्वाधिक ६६ टक्के व्यवहार हवेली तालुका, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत झाले आहेत. त्याखालोखाल मावळ, मुळशी, वेल्हे तालुक्यात १६ टक्के व्यवहार झाले तर, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांत ९ टक्के, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यात ६ टक्के, शिरूर, दौंड तालुक्यात ४ टक्के व्यवहार झाले आहेत.
यंदा फेब्रवारीत एकूण घरांच्या व्यवहारात २५ लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांचे प्रमाण २४ टक्के तर २५ ते ५० लाख रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण ३० टक्के आहे. यामुळे गेल्या महिन्यात गेल्या महिन्यात झालेल्या घरांच्या एकूण व्यवहारात परवडणाऱ्या घरांचे प्रमाण ५४ टक्के आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ते ५९ टक्के होते.
आता त्यात ५ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. गेल्या महिन्यातील घरांच्या एकूण व्यवहारात ५० लाख ते १ कोटी रूपये किमतीच्या घरांचे प्रमाण २९ टक्के, १ ते २.५ कोटी रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण १५ टक्के, २.५ ते ५ कोटी रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण २ टक्के आणि ५ कोटींपेक्षा जास्त किमतीच्या घरांचे प्रमाण १ टक्क्याहून कमी आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पुण्यातील घरांचे व्यवहार
- महिना – व्यवहार – मुद्रांक शुल्क ( कोटी रुपयांत)
- फेब्रवारी २०२५ – १९,०२५ – ७१३
- फेब्रुवारी २०२६ – १५,५७९ – ७०८
फेब्रुवारीतील क्षेत्रफळनिहाय घरांची विक्री
- क्षेत्रफळ (चौरस फूट) – विक्रीतील वाटा (टक्क्यांत)
- ५०० पेक्षा कमी – २३
- ५०० ते ८०० – ४६
- ८०० ते १ हजार – १४
- १ ते २ हजार – १४
- २ हजारपेक्षा जास्त – ३
