पुणे : कसबा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास बंडखोर म्हणून निवडणूक लढण्याची भूमिका काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसकडूून कसब्यात उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच बंडखोरीची चर्चा सुरू झाली आहे.
कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर यांच्यासह माजी महापौर कमल व्यवहारे, नीता परदेशी, गोपाल तिवारी आदी सोळा जणांनी इच्छुक म्हणून नावे नोंदवली होती. तसेच मुलाखतीही दिल्या होत्या. मात्र अद्याप काँग्रेसकडून उमेदवार निश्चित करण्यात आलेला नसल्याने कोणाला संधी मिळणार याविषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.
हेही वाचा >>> कसब्याचा काँग्रेसचा उमेदवार रविवारी जाहीर होणार; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती
या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास बंडखोर म्हणून निवडणूक लढण्याची भूमिका बाळासाहेब दाभेकर यांनी घेतली. गेली ४० वर्षे मी काँग्रेसचे काम करत आहे. त्यामुळे मला संधी दिली जावी. बाहेरच्या पक्षातून आलेल्या उमेदवाराला संधी दिल्यास मी बंडखोर म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.