पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली असतानाच महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. जुन्नर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने जुन्नरमध्ये सांगली पॅटर्न राबविला जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे संकेत काँग्रेसचे आमदार डाॅ. विश्वजीत कदम यांनी दिले आहेत. त्यामुळे जुन्नर मध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके जुन्नरचे आमदार आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांची शरद पवार यांच्याबरोबरची जवळीक वाढली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा जुन्नर तालुक्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर शेरकर आणि डाॅ. विश्वजीत कदम यांची पुण्यात एका बैठकीनिमित्ताने भेट झाली. या बैठकीत जुन्नर विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीत राष्ट्रावदी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे हा मतदारसंघ असल्याने शेरकर यांची अडचण झाली आहे. त्यामुळे जुन्नरमध्ये ‘सांगली पॅटर्न’ राबविला जाईल, असे डाॅ. कदम यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>घातक लेझर झोतांचा वापर करणाऱ्या मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास सुरुवात – पोलिसांकडून चार मंडळांविरुद्ध गुन्हे

लोकसभा निवडणुकीत सांगली पॅटर्न चर्चेत आला होता. सांगलीची जागा काँग्रेसकडे असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तेथे उमेदवारी जाहीर केला होता. त्यामुळे सांगलीमधून काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवित विजय मिळविला होता. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जुन्नरची जागा न मिळाल्यास येथे बंडखोरी होण्याची शक्यता आहे.