पुणे : राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील मुलाखतीसह पदभरतीमध्ये व्यवस्थापननिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात १ हजार ९६ व्यवस्थापनांतील ४ हजार ८७९ पदांसाठी ७ हजार ८०५ उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील कमाल १० प्राधान्यक्रमांसाठी शिफारस करण्यात आली आहे. आता संबंधित उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणी शिक्षण संस्थेकडून घेऊन निवड केली जाणार आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली. शिक्षक भरती प्रक्रियेत आतायर्पंय मुलाखतीशिवाय पदभरतीमध्ये १६ हजार ७९९ पदांची कार्यवाही पूर्ण झाली आहे. मुलाखतीसह पदभरती प्रक्रियेत एकसूत्रता आणण्यासाठी, उमेदवारांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात आली आहे. त्यात मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी ३० गुणांची तरतूद करण्यात आली आहे. मुलाखतीसह पदभरती प्रक्रियेतून पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते दहावी, अकरावी ते बारावी या गटातील ४ हजार ८७९ रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिले होते. हे प्राधान्यक्रम विचारात घेऊन एकूण ७ हजार ८०५ उमेदवारांची कमाल दहा प्राधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आली. विविध कारणास्तव अकरा शिक्षण संस्थांच्या ४३ पदांसाठी उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली जाणार नाहीत. संबंधित संस्थांतील कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पवित्र संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. हेही वाचा >>>पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी घडामोड; बाजार समितीच्या सभापतींचे स्वाक्षरीचे अधिकार काढण्याचा ठराव मंजूर उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून मुलाखतीसह पदभरतीसाठीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी पात्र उमेदवारांना संबंधित शिक्षण संस्थेला संपर्क साधावा लागणार आहे. निवड प्रक्रियेत शिक्षण संस्थेला काही अडचणी आल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाला संपर्क साधायचा आहे. निवडप्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारींचे निराकर करण्यासाठी उमेदवारांना संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांच्याकडे अर्ज करता येईल. उमेदवारांनी अर्जासोबत योग्य ते पुरावे, कागदपत्र जोडावेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या तक्रार अर्जांची तातडीने शहानिशा करून तीन दिवसांत निर्णय संबंधितांना कळवावा. शिक्षणाधिकारी स्तरावरून निराकरण न झाल्यास उमेदवारांना विभागीय उपसंचालकांकडे अपील अर्ज दाखल करता येणार आहे. विभागीय शिक्षण उपसंचालकांनी तीन दिवसात यथोचित निर्णय घेऊन प्रचलित नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.