पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येत असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकारांप्रकरणी आतापर्यंत ८१ जणांना निलंबित करण्यात आले असून, राज्य मंडळाच्या इतिहासातील ही विक्रमी कारवाई ठरली आहे. आतापर्यंत बारावी परीक्षेच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकारांची संख्या कमी असल्याचेही दिसून आले आहे.

राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात येत आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. तसेच, राज्य मंडळाकडून परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीसह भरारी पथके, पोलीस बंदोबस्त, बैठी पथके, आकस्मिक भेटी, विभागीय मंडळांकडून भरारी पथके अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतरही बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, परीक्षार्थ्यांकडे मोबाइल सापडणे असे प्रकार उघडकीस आले. या पार्श्वभूमीवर, गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी तातडीने कठोर भूमिका घेऊन गैरप्रकारांशी संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील प्रकरणात १७, कुर्ला तालुक्यातील यशवंत विद्यालय प्रकरणात एक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर येथील प्रकरणात २१, जालना जिल्ह्यातील तीन कनिष्ठ महाविद्यालयांतील गैरप्रकारांमध्ये मिळून पाच, जुमडा फाटा येथील प्रकरणात तीन शाळांतील मिळून २८, गडचिरोली येथील बोमनवार विद्यालयातील गैरप्रकारप्रकरणी चार, नांदेड जिल्ह्यातील बेटमोगरा येथील प्रकरणात दोन, तर धाराशिव जिल्ह्यातील सलगरा येथील प्रकरणात तीन, अशा एकूण ८१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांत केंद्र संचालक, पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, परीरक्षक, शिपाई आदींचा समावेश आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षांतील गैरप्रकारांसंदर्भात आतापर्यंत ८१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. परीक्षा केंद्र, परीक्षा कक्षातील सीसीटीव्ही कॅमेरे परिणामकारक ठरले आहेत. तसेच, जिल्हा दक्षता समितीनेही चांगले काम केले आहे. बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकारांबाबत केलेल्या कारवाईचा परिणाम दहावीच्या परीक्षांवेळी दिसून आला. बारावीच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकारांची संख्या खूपच कमी आहे. – डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य मंडळ