काहींच्या सर्व प्रतींची विक्री; उलाढाल दहा कोटींहून अधिक होण्याचा अंदाज

पुणे : एक वर्ष करोनामुळे भीतीच्या विळख्यात अडकलेला दिवाळी अंकांचा व्यवहार यंदा जोमाने बहरला असून दिवाळीच्या पहिल्याच आठवडय़ात नावाजलेल्या दहाहून अधिक अंकांच्या प्रती संपल्या आहेत. गेल्या वर्षी या व्यवसायात अनेकांना तोटा झाला असला, तरी यंदा सुरू असलेल्या तुफान खपामुळे अंकांची उलाढाल दहा कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. एकटय़ा पुण्यात एक लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली असून राज्यभरातील वाचकांचा कलही सुखावह आहे.

गेल्या वर्षी करोनाच्या धास्तीने दिवाळी अंकाच्या प्रतींची (पान ४ वर) (पान ३ वरून) संख्या प्रकाशकांनी कमी केली होती. त्यामुळे दिवाळी संपण्यापूर्वीच काही अंक संपले होते. काही प्रकाशकांनी दोन वेळा दिवाळी अंक छापले. या वर्षी दस-यापासूनच दिवाळी अंक उपलब्ध झाल्यामुळे वाचकांना वेळेत आणि मोठय़ा प्रमाणात अंक उपलब्ध झाले, अशी माहिती अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर यांनी दिली.

कारण काय?

गेल्या वर्षी आरोग्य उत्तम राखण्यासाठी झगडताना सर्वच नागरिकांची कसरत सुरू होती. करोनाच्या टाळेबंदीमुळे अनेकांकडे पुष्कळ वेळ असला, तरी सार्वत्रिक असलेल्या मानसिक भयाचा परिणाम म्हणून वाचनाकडे लोकांनी पाठ फिरविली. यंदा विषाणूभयाचे चित्र उलटल्यामुळे वाचकांनी दिवाळी अंकांना प्रचंड प्रतिसाद दिला असावा, असे अनेक विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

सुखावह बदल..

दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये राज्यभरातील दिवाळी अंकांची उलाढाल नऊ कोटी रुपयांच्या जवळपास होती. गेल्या वर्षी करोनामुळे ही उलाढाल जेममेम ५० टक्क्यांवर आली. फक्त साडेचार कोटी रुपयांचीच उलाढाल होऊ शकली. यंदा दिवाळीनंतरच्या आठवडय़ातच उलाढाल दहाकोटींवर जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वैयक्तिक खरेदी, खासगी आणि सार्वजनीक वाचनालयांतून उचलल्या जाणाऱ्या अंकांची संख्या यंदा सर्वाधिक असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

साहित्यविषयक अंकांचा प्रतिसाद..

साहित्यविषयक दिवाळी अंकांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. यामधे  मौज, अक्षर, चंद्रकांत, दीपावली, लोकसत्ता, अक्षरधारा, हंस, कथाश्री, किस्त्रीम, ऋतुरंग, साधना, पद्मगंधा या अंकांना सर्वोत्तम प्रतिसाद होता.