पुणे : करोनाकाळानंतर यंदा पहिल्यांदाच शेती उत्पादन मुबलक येणार असून गेल्या पाच वर्षांतील विक्रमी आकडा गाठण्याची शक्यता आहे. हवामानातील बदल, पावसाचे बिघडलेले चक्र या पार्श्वभूमीवर देखील शेतकऱ्यांनी नियोजन करीत उत्पादनाचा उच्चांक गाठण्यासाठी कष्ट केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बुधवारी देशातील कृषी उत्पादनाविषयीचा चौथा सुधारित अंदाज जाहीर केला. या वेळी तोमर म्हणाले, ‘‘गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा २५ दशलक्ष टनांनी अन्नधान्याचे उत्पादन जास्त होणार आहे. प्रामुख्याने तांदूळ, मका, हरभरा, विविध प्रकारच्या डाळी, कडधान्ये, मोहरीसह अन्य तेलबिया आणि उसाच्या उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे. केंद्र सरकारचे शेतीपूरक धोरण आणि शेतकऱ्यांच्या कष्टाच्या जोरावर हे विक्रमी उत्पादन निघत आहे.’’

चौथ्या सुधारित अंदाजानुसार अन्नधान्यांचे ३१५.७२ दशलक्ष टन उत्पादन होईल. त्यात तांदूळ १३०.२९ दशलक्ष टन आणि गव्हाचे १०६.८४ दशलक्ष टन उत्पादन होईल. भरड धान्याचे उत्पादन ५०.९० दशलक्ष टन, मका ३३.६२ दशलक्ष टन, डाळी २७.६९ दशलक्ष टन, तूर ४.३४ दशलक्ष टन, हरभरा १३.७५ दशलक्ष टन, तेलबिया ३७.७० दशलक्ष टन, भुईमूग १०.११ दशलक्ष टन, सोयाबीन १२.९९ दशलक्ष टन, मोहरी ११.७५ दशलक्ष टन, ऊस ४३१.८१ दशलक्ष टन, कापूस ३१.२० दशलक्ष गाठी (एका गाठ १७० किलो), ज्यूट (ताग) आणि मेस्ता १०.३२ दशलक्ष गाठींच्या (एक गाठ १८० किलो) उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उसाचे काय?

उसाचा विचार करता देशात २०२१-२२मध्ये उसाचे ४३१.८१ दशलक्ष टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. देशात उसाचे सरासरी उत्पादन ३७३.४६ दशलक्ष टन होते. यंदा त्यात ५८.३५ दशलक्ष टनांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कापूस मात्र..

देशात यंदा ३१२.०३ दशलक्ष गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे उत्पादन मागील वर्षांपेक्षा कमी आहे. मागील वर्षी (२०२०-२१) ३५२.४८ दशलक्ष गाठींचे उत्पादन झाले होते. अतिवृष्टी, अवेळी पावसामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून कमी उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विशेष काय? देशात २०२१-२२ या वर्षांत अन्नधान्याचे विक्रमी ३१५.७२ दशलक्ष टन उत्पादन होईल, हे गेल्या वर्षीपेक्षा ४.९८ दशलक्ष टनांनी जास्त असेल, असा अंदाज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने वर्तविला आहे.

तांदूळ उच्चांकी..

२०२१-२२ या वर्षांत विक्रमी तांदूळ उत्पादनाचा अंदाज आहे. सुमारे १३०.२९ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या १३.८५ दशलक्ष टनांनी अधिक उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांत सरासरी ११६.८४ दशलक्ष टन उत्पादन होत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record grain production union ministry agriculture statistics ysh
First published on: 19-08-2022 at 00:02 IST