नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ई-रजिस्ट्रेशन प्रणाली अंतर्गत बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातच सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे नोंद करण्यात येत आहेत. त्यानुसार गेल्या दोन वर्षांत सात हजार सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे बिल्डरांच्या कार्यालयात नोंद करण्यात आले आहेत. सध्या राज्यातील १४६ बांधकाम व्यावसायिकांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले असून संबंधितांना मान्यता मिळाल्यास राज्यभरातील तब्बल एक लाख २७ हजार ५९५ सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे बिल्डरांच्या कार्यालयात नोंद होणार असून त्याकरिता नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : दहीहंडी उत्सवात गोळीबार ; गुंड टोळीवर मोक्का कारवाई

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून मालमत्ता खरेदी-विक्रीला चालना देण्यासाठी आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक कार्यालयांत गर्दी होऊ नये म्हणून बांधकाम व्यावसायिकांना दस्त नोंदणी केंद्र सुरू करण्याचे परवाने सन २०२० पासून देण्यात येत आहेत. मात्र, सुरुवातीला सदनिकांच्या प्रथम विक्री करारनाम्याच्या नोंदणीसाठी ई-रजिस्ट्रेशन प्रणालीअंतर्गत ५०० दस्तांची नोंद करण्याचे बंधन होते. त्यामुळे मोठा गृहप्रकल्प असलेल्या बांधकाम व्यावसायिकांनाच या सुविधेचा लाभ घेता येत होता. ही बाब लक्षात घेऊन हे बंधन उठवण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणत्याही बांधकाम व्यावसायिकांना दस्त नोंदणी केंद्रासाठी परवाने दिले जात आहेत.

हेही वाचा >>> पुणे : अतिवृष्टी बाधितांसाठी तीन कोटी १८ लाखांचा निधी प्राप्त

याबाबत बोलताना नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातच सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे नोंद करण्याच्या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत राज्यभरातून ४२३ बिल्डरांनी या सुविधेसाठी अर्ज केले. त्यापैकी ३६३ जणांचे अर्ज छाननीअंती मंजूर करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत सात हजारपेक्षा जास्त सदनिकांचे प्रथम करारनामे बिल्डरांच्या कार्यालयातच नोंद करण्यात आले. त्यामुळे संबंधित नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात येण्याची गरज भासली नाही.’दरम्यान, सध्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे राज्यभरातील १४६ बिल्डरांनी ई-रजिस्ट्रेशन अंतर्गत सदनिकांच्या प्रथम विक्री करारनाम्यांच्या नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. या अर्जांची छाननी करण्यात येत आहे. छाननीअंती हे अर्ज मंजूर झाल्यास आगामी काळात एक लाख २७ हजार ५९५ सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे संबंधित बिल्डरांच्या कार्यालयातच नोंद होऊ शकतील, असेही हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> दुधाला एफआरपी देण्याची मागणी; संघर्ष समितीकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

प्रक्रिया कशी चालते?
बांधकाम व्यावसायिकाकडे असलेल्या केंद्रामध्ये ऑनलाइन दस्त नोंदणी करण्यात आल्यानंतर संबंधित माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाकडे पाठवण्यात येते. निबंधकांकडून कागदपत्रांची छाननी होऊन मंजुरी देण्यात येते. बांधकाम व्यावसायिक आणि दुय्यम निबंधक कार्यालय यांच्यामधील ही प्रक्रिया असल्याने नागरिकांसाठी दस्त नोंदणी सोपी झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Records of sale agreements of flats now easy pune print news amy
First published on: 27-09-2022 at 17:35 IST