पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांतील सहायक प्राध्यापकांच्या १३३ जागांसाठी कंत्राटी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदावर निवड होणाऱ्यांना ३१ मे २०२५ पर्यंत काम करता येणार असून, या जागांसाठी इच्छुक उमेदवारांना २७ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी या भरतीची जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. विद्यापीठातील १११ पदांवर भरती प्रक्रियेसाठी राज्य शासनाने मान्यता दिली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ही भरती प्रक्रिया रखडली आहे. तसेच अधिष्ठाता, नवोपक्रम संचालक, कुलसचिव अशी पदेही अतिरिक्त कार्यभाराने चालवली जात आहेत. रिक्त जागांमुळे शैक्षणिक, प्रशासकीय कामकाज करणे अवघड होत आहे. त्यामुळे प्राध्यापकांना अध्यापनासह दोन-तीन जबाबदाऱ्या पेलाव्या लागत आहेत. या पार्श्वभूवीर विद्यापीठाने कंत्राटी भरती राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – बटाट्यापासून आता इथेनॉल निर्मिती ? जाणून घ्या, केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेचा प्रयोग

हेही वाचा – पुण्यात सरींवर सरी

विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखा, मानव्य विज्ञान विद्याशाखा आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा या सर्व विद्याशाखांअंतर्गत शैक्षणिक विभागांतील पदे भरली जाणार आहेत. तसेच स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी चार पदे, विद्यापीठाच्या नाशिक केंद्रामधील व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या चार पदांचाही समावेश आहे. १३३ पदांसाठीची ही प्रक्रिया आरक्षणनिहाय राबवली जाणार आहे. या पदांसाठी उमेदवारांना २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीमध्ये ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.