MPSC कडून प्रथमच ‘दुय्यम निबंधक’ पदाची भरती; संयुक्त पूर्व परीक्षा २०२२साठी ८०० पदांची जाहिरात प्रसिद्ध

या पदाची १९९४ नंतर पहिल्यांदाच भरती होणार आहे; जाणून घ्या काय आहे परीक्षेची तारीख

mpsc exam
(संग्रहीत छायाचित्र)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ची आठशे पदांच्या भरतीची जाहिरात आज (गुरुवार) प्रसिद्ध करण्यात आली. दुय्यम निबंधक पदाची भरती प्रक्रिया प्रथम एमपीएससीमार्फत करण्यात येणार असून, या पदाची १९९४ नंतर पहिल्यांदाच भरती होणार आहे.

एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार राज्यभरातील ३७ केंद्रांवर ८ ऑक्टोबरला पूर्व परीक्षा घेण्यात येईल. तर मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये किंवा त्यानंतर होण्याची शक्यता आहे. सहायक कक्ष अधिकारी गट ब या संवर्गातील ४२, राज्य कर निरीक्षक गट ब या संवर्गातील ७९, पोलीस उपनिरीक्षक गट ब या संवर्गातील ६०३ आणि दुय्यम निबंधक संवर्गातील ७८ पदांची भरती केली जाणार आहे.

उमेदवारांना या परीक्षेसाठी २५ जून ते १५ जुलै या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
यंदा या परीक्षेच्या पदांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. २०२०मध्ये ८०७, २०२१मध्ये १ हजार ८५ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तर २०२२ साठी आठशे पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र संवर्गातील पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होऊ शकतो. तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेतली जातील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पहिल्यांदाच या पदाची भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत –

“ १९९४ नंतर मुद्रांक आणि नोंदणी विभागातील दुय्यम निबंधक संवर्गाची पदभरती झालेली नव्हती. ही पदे एमपीएससीच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. आता पहिल्यांदाच या पदाची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबवली जाईल.” अशी माहिती एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Recruitment of secondary registrar for the first time from mpsc advertisement published for 800 posts pune print news msr

Next Story
वखार महामंडळात नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी