Reduction in the price of vegetables in the wholesale market in the market yard pune | Loksatta

पुणे: मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मटार, फ्लाॅवर, कोबी, वांगी, मिरची स्वस्त

फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली.

पुणे: मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मटार, फ्लाॅवर, कोबी, वांगी, मिरची स्वस्त
पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मटार, फ्लाॅवर, कोबी, वांगी, मिरची स्वस्त (संग्रहित छायाचित्र)

पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मटार, फ्लाॅवर, कोबी, घेवडा, वांगी, ढोबळी मिरची, हिरवी मिरची या फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

हेही वाचा- अपंगांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेची कौशल्य प्रशिक्षण योजना

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (४ डिसेंबर) राज्य तसेच परराज्यांतून ९० ते ९५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १४ ते १५ ट्रक हिरवी मिरची, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी तसेच २ ते ३ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून २ ते ३ टेम्पो शेवगा, राजस्थानातून ९ ते १० टेम्पो गाजर,पंजाब आणि मध्य प्रदेशातून मिळून ३० टेम्पो मटार, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटकातून १ टेम्पो तोतापुरी कैरी, बंगळुरुतून २ टेम्पो आले, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १२ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ३० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले १२०० ते १३०० गोणी, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो १० हजार पेटी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कांदा १०० ट्रक अशी आवक झाली.

हेही वाचा- वादग्रस्त ‘एकनाथ शिंदे उद्याना’चे नामकरण ‘धर्मवीर आनंद दिघे उद्यान’; मुख्यमंत्र्यांऐवजी खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते आज उद्घाटन

कोथिंबिर, मेथी, शेपू, करडईच्या दरात घट

मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिर, मेथी, शेपू, करडई या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. पुदिना, अंबाडी, चुका या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. कांदापात, चाकवत, मुळा, राजगिरा, चवळई, पालक या पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. तरकारी विभागात काेथिंबिरीच्या सव्वालाख जुडी; तसेच मेथीच्या ८० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत मेथीच्या जुडीमागे ४ रुपये, शेपूच्या जुडीमागे ३ रुपये, करडईच्या जुडीमागे २ रुपयांनी घट झाली. पुदिना आणि चुक्याच्या दरात जुडीमागे २ रुपयांनी वाढ झाली. अंबाडीच्या जुडीमागे १ रुपयांनी वाढ झाली. अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत.

अननस, बोरे, लिंबांच्या दरात घट

फळबाजारात बोरे, लिंबाची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने बोरांच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी घट झाली आहे. लिंबांच्या गाेणीमागे ५० रुपयांनी तसेच अननसाच्या दरात डझनामागे १०० रुपयांनी घट झाली आहे. अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. थंडीमुळे पपईला मागणी वाढली आहे. पपईच्या दरात किलोमागे १० रुपयांनी वाढ झाली आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी केरळमधून ४ ट्रक अननस, संत्री २५ ते ३० टन, मोसंबी ४० ते ५० टन, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबे ४ ते ५ हजार गोणी, पेरु १२०० ते १३०० क्रेट्स (प्लास्टिक जाळी), कलिंगड ४ ते ८ ट्रक, खरबूज ३ ते ४ टेम्पो, बोरे १ ते दीड हजार गोणी, सीताफळ १० ते १५ टन अशी आवक झाली.

लग्नसराईमुळे फुलांना मागणी

लग्नसराईमुळे शोभीवंत फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. फुलांचे दर तेजीत असल्याची माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली. घाऊक बाजारात एक किलो फुलांचे दर पुढीलप्रमाणे- झेंडू- १० ते २५ रुपये किलो, गुलछडी-२० ते ४० रुपये, ऑस्टर जुडी- ५ ते १५ रुपये, सुट्टी-५० ते ८० रुपये, कापरी- १० ते ३० रुपये, शेवंती- १० ते ३५ रुपये, जर्बेरा- ३० ते ५० रुपये, कार्निशियन- १५० ते २५० रुपये, शेवंती काडी- १५० ते २००, लिलियम (१० काड्या)- ८०० ते १२०० रुपये, ऑर्चिड- ४०० ते ५०० रुपये

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 16:46 IST
Next Story
चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून; १८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल