पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस ओसरला आहे. त्यामुळे वरसगाव आणि पानशेत धरणांमधून खडकवासला धरणात सोडण्यात येणारे पाणी कमी करण्यात आले आहे. परिणामी खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गात ५१३८ क्युसेकपर्यंत कपात करण्यात आली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या परिसरात मंगळवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारीपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात ६५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ६९ मि.मी., पानशेत धरणक्षेत्रात ६८ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात ३२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. शुक्रवारी रात्रीपर्यंत खडकवासला धरणातून ३० हजार ६७७ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक पाण्याचा विसर्ग होता. मात्र, रात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने वरसगाव आणि पानशेत धरणांमधून खडकवासला धरणात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. परिणामी खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मध्यरात्री एक वाजता २७ हजार २०३ क्युसेकपर्यंत विसर्ग कमी करण्यात आला. पहाटे चार वाजता १८ हजार ४९१ क्युसेक, सकाळी आठ वाजता ७०७३ क्युसेक, तर नऊ वाजल्यापासून ५१३८ क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : पिंपरी : नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे ; पालिका आयुक्तांचे आवाहन

जिल्ह्यातील २६ पैकी २५ धरणांमधून पाण्याचा विसर्ग

धरणाचे नाव विसर्ग (क्युसेक वेगाने)
पिंपळगाव जोगे -५०००
येडगाव- १४,००७
वडज- ४१५१
डिंभे १५,०४५
घोड -४०,६८०
विसापूर- १००
चिल्हेवाडी -३०००
कळमोडी -१०३४
चासकमान -३६४५
भामा आसखेड -११३३
वडीवळे -२७३५
आंद्रा -१४७९
पवना -२६०६
कासारसाई -११५६
मुळशी -३५७१
टेमघर -३३८०
वरसगाव -२४७९
पानशेत -२४८४
खडकवासला -५७२८
गुंजवणी-२४५८
निरा देवघर -२६१६
भाटघर- ७०००
वीर -१५९११
नाझरे -४५०
उजनी – ९०,०००