पुणे : निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात शिरुन पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेली रीलस्टार दिव्या शिंदे हिच्या पोलीस कोठडीत दोन दिवस वाढ करण्याचे आदेश लष्कर न्यायालयाने बुधवारी दिली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमित कुलकर्णी यांनी याबाबतचे आदेश दिले.
पुणे कटक मंडळातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या वानवडीतील घरात शिरुन दिव्या शिंदे आणि साथीदारांनी मारहाण केली होती, तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. शिंदे हिला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. तिच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी (३० सप्टेंबर) संपली. तिला लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. ‘ वैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ल्यात आणखी काही आरोपी सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचा शोध घ्यायचा आहे. आरोपींनी वापरलेली शस्त्रे, मोबाइल संच, वाहने जप्त करायची आहेत. अटकेत असलेली आरोपी दिव्या शिंदे ही पोलिसांना तपासात सहकार्य करत नाही. ती माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे’, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली.
‘या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी‘, अशी विनंती सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे आणि तक्रारदारांचे वकील शिवम निंबाळकर यांनी केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलीस कोठडीस विरोध केला. ‘तक्रारदार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एका कार्यक्रमासाठी शिंदेला श्रीलंकेत नेले होते. तिच्या कामाचे पैसे दिले नव्हते. याबाबत शिंदे हिने २४ सप्टेंबर रोजी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तिच्या आईने पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला होता’, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवादात नमूद केले. दाेन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालायने शिंदे हिच्या पोलीस कोठडीत २ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.
निवृत्त वैद्यकीय अधिकारी हे एका सामाजिक संस्थेशी संबंधित आहेत. २ आणि ३ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिंदे हिला निमंत्रित करण्यात आले नव्हते. शिंदे ही कार्यक्रमात सहभागी झाली. त्यानंतर तिने वैद्यकीय अधिकाऱ्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात शिरुन साथीदारांनी मारहाण केली होती.
