पुणे : पुणे कटक मंडळातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी हल्ला केल्याप्रकरणी रीलस्टार दिव्या शिंदे हिला अटक करण्यात आली असून, तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दिव्याला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या शिंदे (रा. सनसिटी रस्ता, सिंहगड रस्ता) हिला अटक करण्यात आली आहे. तिच्या आठ ते दहा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत पुणे कटक मंडळातील निवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार २०२१ मध्ये निवृत्त झाले. ते एका स्वयंसेवी संस्थेचे सदस्य आहेत. या संस्थेकडून १ ते ३ सप्टेंबर दरम्यान कला आविष्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शिंदे हिला संबंधित संस्थेकडून अधिकृत आमंत्रण देण्यात आले नव्हते. या कार्यक्रमाची प्रसिद्धी समाजमाध्यमातून केल्याचे सांगून शिंदे हिने तक्रारदारांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून पैशांची मागणी केली. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी शिंदे आणि साथीदार तक्रारदाराच्या निवासस्थानी गेले. त्या वेळी ते तेथे नव्हते. तेव्हा शिंदे आणि साथीदारांनी पत्नी आणि मुलाला दमदाटी केली. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी तिने तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. लष्कर भागातील एका प्रसिद्ध हाॅटेलमध्ये त्यांना बोलविले. तेथे त्यांना धमकावून पाच लाख रुपये मागितली. २४ सप्टेंबर रोजी रात्री तक्रारदार एकटे घरी होते. त्या वेळी शिंदे आणि साथीदार तेथे आले. घरात शिरून तक्रारदाराला मारहाण केली.सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत.