पुणे : नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला पूर्णवेळ अधिकारी देण्याऐवजी महसूल विभागाने या विभागाकडील अतिरिक्त कार्यभार कायम ठेवला आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्याच्या निर्णयानंतरही नोंदणी-मुद्रांक विभागाला पूर्णवेळ अधिकाऱ्यांची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. दरम्यान, राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी आणि सहायक नोंदणी महानिरीक्षक पदे रिक्त असताना, या पदांसाठी नियुक्त केलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडेही अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. रिक्त पदांमुळे निर्माण झालेली प्रशासकीय अडचण दूर करण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पदभरतीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर राज्य सरकारने अलीकडेच विविध जिल्ह्यांतील पदांसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे आदेश काढले. मात्र, या नियुक्त्यांमध्येही संबंधित अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याने पूर्णवेळ अधिकारी नेमण्याचा प्रश्न कायम राहिला आहे.

नोंदणी-मुद्रांक विभागातील पदांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळताना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावरील जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागणार आहेत. त्यामुळे दोन्ही कार्यालयांतील कामकाजासाठी वेळ देताना प्रशासकीय ताण वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या मंजूर आकृतिबंधानुसार सहायक नोंदणी महानिरीक्षक, कार्यासीन अधिकारी, भरारी पथक, अंमलबजावणी विभाग आणि सुविधा उपक्रमांसाठीही उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासह शहरातील विविध पदांवर कार्यरत असलेल्या १५ उपजिल्हाधिकाऱ्यांचाही या नियुक्त्यांमध्ये समावेश असल्याची माहिती नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आली.

राज्यात नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची ५८१ दुय्यम निबंधक कार्यालये असून, ३६ जिल्ह्यांसाठी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पदांची व्यवस्था आहे. मात्र, २८ जिल्ह्यांमध्ये संबंधित पदे रिक्त आहेत. त्यामुळे अन्य अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवून या विभागाचा कारभार चालविला जात आहे.