पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील रेल्वे महामार्गालगतच्या जागेतील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची घरे रेल्वे विभागाकडून हटवण्यात येणार आहेत. संबंधितांचे राज्य सरकारने पुनर्वसन करावे, अशी मागणी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या विषयात मध्यस्थी करून सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी येथील रहिवाशांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
रेल्वेलगतच्या झोपडपट्टीधारकांना तातडीने घरे रिकामी करण्याबाबत रेल्वेने नोटीस बजावली आहे. चिंचवड स्टेशन येथील साईबाबानगर, आनंदनगर, कासारवाडी, पिंपरी, दापोडी, दळवीनगर आदी भागांत रेल्वेलगत अनेक वर्षांपासून झोपडय़ा आहेत. रेल्वेकडून कारवाई झाल्यास जवळपास ४५ हजार नागरिक बेघर होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी राज्य सरकारची आहे, प्रत्यक्षात, राज्य सरकारने याबाबत अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक घेऊन याबाबतचा ठोस निर्णय घेण्याची मागणी आमदार लांडगे यांनी वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी अजित पवार यांनी सर्व संबंधितांची बैठक घ्यावी आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने मारूती भापकर, प्रसाद शेट्टी, मारुती पंद्री, गणेश लंगोटे, अंकुश कानडी आदींनी केली आहे.