महाराष्ट्र साहित्य परिषद, राजहंस प्रकाशन आणि ढोले कुटुंबीयांतर्फे मराठी अनुवाद क्षेत्रातील योगदानाबद्दल रवींद्र गुर्जर यांना आणि मुखपृष्ठकार पुंडलिक वझे यांना रेखा ढोले स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, ‘बोस्कीच्या गोष्टी’ या पुस्तकाच्या निर्मितीसाठी ग्रंथाली प्रकाशन संस्थेलाही पुरस्कार जाहीर झाला आहे.

रेखा ढोले या राजहंस प्रकाशनच्या सुहृद आणि जाणकार साहित्यप्रेमी होत्या. राजहंस प्रकाशनच्या विविध पुस्तकांच्या दर्जेदार निर्मितीमध्ये त्यांचा मौलिक सहभाग असे. त्यांना रुची असलेल्या अनुवाद आणि पुस्तकनिर्मिती या दोन क्षेत्रांसाठी त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याची योजना राजहंस प्रकाशन आणि ढोले कुटुंबीयांनी आखली. २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे गुर्जर यांच्या पुरस्काराचे, तर १५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे वझे यांच्या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर, दहा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे ग्रंथाली प्रकाशनला प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये रविवारी (२९ मे) सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले  हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.