पुणे- हडपसर स्थानकाच्या दरम्यान असलेल्या ८८ वर्षे जुन्या दरगाड पुलाचे लोखंडी गार्डर बदलून या पुलाचे नूतनीकरण करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. १३ व २५ जून या दोन दिवशी काही वेळांचा रेल्वे ब्लॉक ठेवून शंभरहून अधिक कर्मचारी व तंत्रज्ञांनी केवळ साडेचार तासांत हे काम पूर्ण केले.
रेल्वेच्या या दरगाह पुलाचे बांधकाम १९२५ मध्ये करण्यात आले होते. पूल जुना झाल्याने त्याचे लोखंडी गार्डर व त्यावरील लोहमार्ग बदलण्याचे काम दोन टप्प्यात हाती घेण्यात आले होते. १३ जूनला एका मार्गावरील काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर २५ जूनला दुसऱ्या मार्गावरील काम पूर्ण करण्यात आले. या पुलाचे वजन लोहमार्गासह सुमारे ७५ टन होते. त्याला तीन भागांमध्ये कापून हटविण्यात आले व त्याजागी लोहमार्गासह नवे गार्डर बसविण्यात आले. त्यापूर्वी गार्डरखाली आरसीसी ब्लॉक बसविण्यात आले. ११ रेल्वे कर्मचारी व १० तंत्रज्ञांनी साडेचार तासांच्या कालावधीत हे काम पूर्ण केले.
रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक विशाल अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अभियंता गौतम बिऱ्हाडे, आर. के. देवनाले, सलीन खान, डी. एन. शेणाय, सहाय्यक अभियंता पी. एच. वाजपेयी आदींच्या परिश्रमातून हे काम नियोजित वेळेत व यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.