पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरवस्थेबाबत नाट्यकर्मींनी टीकेची झोड उठविल्यानंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्युत, ध्वनियंत्रणा आणि वातानुकूलन यंत्रणेसाठी महापालिकेकडून तीस लाखांची निविदा काढण्यात आली आहे. त्यानुसार ही कामे येत्या काही दिवसांत सुरू होतील, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बालगंधर्व रंगमंदिरासह अन्य नाट्यगृहांच्या दुरवस्थेचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सातत्याने दिले आहे. त्याची दखल घेऊन महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरात महापालिकेची चौदा नाट्यगृहे आहेत. बालगंधर्व रंगमंदिर, स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंदिर, कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सातारा रस्ता परिसरातील अण्णा भाऊ साठे रंगमंदिर ही प्रमुख नाट्यगृहे आहेत. मात्र, या चारही प्रमुख नाट्यगृहांची दुरवस्था झाली असून पिण्याच्या पाण्याचा अभाव, अस्वच्छ स्वच्छतागृहे, बंद अवस्थेतील वातानुकूलन आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा आहे. अनेक नाट्यगृहांना रंगरंगोटीची आवश्यकता आहे.

हेही वाचा >>> भाजप मावळ, शिरूरवर दावा करणार का? बाळा भेगडे म्हणाले, “जर भाजप आणि…”

त्यातही बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरवस्थेबाबत नाट्यकर्मींनी समाजमाध्यमातून नाराजी व्यक्त केली होती. बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरवस्थेचा प्रश्न पुढे आल्यानंतर त्याची दखल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही घेतली होती. १५ जुलैपर्यंत दुरुस्तीची कामे पूर्ण करावी, असे आदेश पाटील यांनी दिले होते. नूतनीकरण करताना नागरिक आणि नाट्यकर्मींकडून सूचना मागविण्याचे आदेशही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून त्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाकडून ३० लाखांची निविदा काढण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पुणे : पालखी सोहळ्यासाठी पीएमपीकडून आजपासून विशेष बस सेवा

बालगंधर्व रंगमंदिरातील विद्युत, वीज, ध्वनियंत्रणा आणि अन्य अनुषंगिक कामे तातडीने करण्यात येणार आहेत. बालगंधर्व रंगमंदिरामधील वातानुकूलन यंत्रणा, वीज आणि ध्वनियंत्रणेच्या देखभार दुरुस्तीसाठी ऑपरेटर आणि बिगारी नेमण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया महापालिकेच्या विद्युत विभागाकडून राबविण्याात आली आहे. वीज आणि ध्वनियंत्रणेसाठी दोन ऑपरेटर आणि वातानुकूलन यंत्रणेसाठी दोन बिगारी नेण्यात येणार आहेत. दिवस आणि रात्रपाळीमध्ये त्याची नियमित कामे केली जाणार आहेत.

नाट्यगृहांची दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी सात कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या भवन विभागाकडून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असून सात कोटींच्या खर्चाचा आराखडा करण्यात आला आहे. त्याबाबतचे पूर्वगणनपत्रकही तयार करण्यात आले आहे. पूर्वगणन समितीची आराखड्याला मान्यता दिल्यानंतर त्याबाबतची निविदा काढण्यात येणार असून ऑगस्टपर्यंत ही कामे पूर्ण होतील, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

बालगंधर्व रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीसाठीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार निविदा काढण्यात आली असून रंगमंदिरातील वीज. ध्वनी आणि वातानुकूलन यंत्रणेची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या काही दिवसांत ही कामे पूर्ण होतील. –श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renovation of balgandharva rangmandir protest of the theater workers pune print news apk 13 ysh
First published on: 08-06-2023 at 12:13 IST