पुणे : ज्येष्ठ आणि नामवंत हृदयरोगतज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिकच्या कार्डियाक कॅथ लॅबचे संचालक डॉ. शिरीष हिरेमठ यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. मेंदूतील गंभीर आजाराशी त्यांची दीर्घकाळ झुंज सुरू होती. त्यांच्या निधनाने पुण्यासह देशातील हृदयरोग उपचार क्षेत्रातील एक अनुभवी आणि कुशल तज्ज्ञ हरपल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.डॉ. हिरेमठ यांनी हृदयरोगावरील उपचारांमध्ये विशेषतः गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी प्रक्रियांमध्ये मोठे योगदान दिले. पुण्यातील पहिली एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया 1989 मध्ये त्यांनी केली.
देशभरातून तसेच परदेशातूनही रुग्ण उपचारांसाठी त्यांच्याकडे येत असत. कठीण शस्त्रक्रिया आणि उपचारपद्धतींमध्ये त्यांनी आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला होता. हृदयरोगांचे प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचार याबाबत जनजागृती करण्यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. हृदयविकाराच्या झटक्यावरील उपचारांमध्ये औषधोपचार आणि त्यानंतरच्या रक्तवाहिनीविषयक प्रक्रियेचा एकत्रित वापर लोकप्रिय करण्यात त्यांचे योगदान होते.
चार दशकांचा सहप्रवास; डॉ. भाटे यांच्याकडून आठवणींना उजाळा
डॉ. हिरेमठ यांच्या निधनानंतर ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एस. जी. भाटे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. डॉ. हिरेमठ यांच्याशी आपला सुमारे चार दशकांचा सहवास होता. या काळात अनेक आव्हानात्मक आणि नावीन्यपूर्ण उपचारप्रक्रियांमध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळाली, असे त्यांनी नमूद केले. काही प्रक्रिया महाराष्ट्रात प्रथमच करण्यात आल्या होत्या.
गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टीसाठी डॉ. हिरेमठ यांची विशेष ओळख होती. रुग्णांच्या उपचारांसाठी ते कॅथ लॅबमध्ये चार ते सहा तास किंवा त्याहून अधिक काळ काम करीत असत. उदयोन्मुख वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अभ्यास करून रुग्णांना अधिक चांगले उपचार देण्याची त्यांची धडपड सुरू असे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुग्णसेवा, तपासण्या, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये ते व्यग्र असत, अशा शब्दांत डॉ. भाटे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
आजारावर मात केल्याचे वाटत असतानाच प्रकृती खालावली
कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्यांना मेंदूतील गंभीर गाठीचे निदान झाले. शस्त्रक्रिया आणि उपचारांनंतर काही महिन्यांतच ते पुन्हा कामावर रुजू झाले होते. मात्र, त्यानंतर उपचारांमुळे स्मरणशक्ती आणि आकलन क्षमतेवर परिणाम झाला. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रातील एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
