ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन

जोग यांच्यावर गेल्या महिनाभरापासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी रात्री त्यांना घरी आणण्यात आले होते.

पुणे : ज्येष्ठ संगीतकार, तरल वादनातून स्वरांबरोबरच व्यंजनेही लीलया वाजविणारे व्हायोलिन वादक आणि गीतरामायणाचे संगीत संयोजक प्रभाकर गणेशपंत जोग (वय ८८) यांचे अल्पशा आजाराने रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

जोग यांच्यावर गेल्या महिनाभरापासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी रात्री त्यांना घरी आणण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. जोग यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

व्हायोलिन वादक, संगीत संयोजक आणि नंतर संगीतकार म्हणून जोग यांनी सहा दशकांहून अधिक काळ मराठी आणि हिंदूी चित्रपट क्षेत्रात कार्यरत राहून अवीट स्वरांचा ठसा उमटविला. ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांचे सहायक आणि संगीत संयोजक म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. ‘गीतरामायणा’तील अजरामर गाण्यांना प्रभाकर जोग यांच्या संगीत संयोजनासह व्हायोलिनचे सूर लाभले आहेत. बाबूजींसोबत गीत रामायणाच्या पाचशे कार्यक्रमांना त्यांनी साथ दिली. मराठी भावगीत आणि हिंदूी गीतांचे व्हायोलिनवर सादरीकरण करून जोग यांनी व्हायोलिनला गाते केले. त्यांच्या व्हायोलिन वादनातून शब्द ऐकू येऊ लागल्याने त्यांचे वादन गाणारे व्हायोलिन म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी या तसेच ‘गाता रहे मेरा व्हायोलिन’ या नावाने  अनेक ठिकाणी कार्यक्रम केले. या ध्वनिफितींना श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र सरकारतर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने त्यांचा गौरव झाला होता.

गजाननराव जोशी आणि नारायणराव मारुलीकर यांच्याकडून वयाच्या पाचव्या वर्षांपासून गायन शिकण्यास सुरुवात केली. आजीने त्यांना छोटे व्हायोलिन आणून दिले. जोग यांनी या वाद्यावर हळूहळू प्रभुत्व मिळवले. पुढे हे वाद्य त्यांची ओळख झाली. बाराव्या वर्षी पुण्यात सव्वा रुपया आणि नारळाच्या बिदागीवर व्हायोलिनवादन कार्यक्रमांना सुरुवात केली. पुढे ते बंधू वामनराव जोग यांच्यासह आकाशवाणीवर व्हायोलिन वादक म्हणून नोकरीला लागले. संगीतकार स्नेहल भाटकर यांनी संगीत दिलेल्या गुरुदेवदत्त या १९५१ च्या चित्रपटासाठी जोग यांनी व्हायोलिन वादन केले. त्यानंतर त्यांनी सुधीर फडके, श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, ह्रदयनाथ मंगेशकर, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम आणि यशवंत देव यांच्यासोबत काम केले. हिंदूी चित्रपटसृष्टीतील मदनमोहन, एस. डी. आणि आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन, खय्याम, ओ. पी. नय्यर, उषा खन्ना, जयदेव, रवींद्र जैन या संगीतकारांसोबत काम करून व्हायोलिनच्यम साथीने त्यांनी गुंफलेली गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. महाराष्ट्र सरकारतर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, सूरसिंगार पुरस्कार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक चित्रकवी पुरस्कार, गदिमा पुरस्कार, भारत गायन समाजातर्फे वसुंधरा पंडित पुरस्कार अशा पुरस्कारांनी जोग यांना गौरवण्यात आले होते.

आदरांजली

प्रभाकर गणेशपंत जोग १९३२ – २०२१

गदिमांच्या गीतरामायणातील अनेक प्रसंग प्रभाकर जोग यांनी आपल्या व्हायोलिनच्या सुरावटींमधून जिवंत केले. व्हायोलिनला गायला लावणारा, शब्दांपलीकडे जाऊन त्यातून आर्त आणि हळव्या भावना व्यक्त करण्याची किमया साधणारा संगीत क्षेत्रातील एक सच्चा साधक गमावला आहे. संगीतकार सुधीर फडके यांचे सूर आणि त्यांना व्हायोलिनद्वारे साथसंगत करणारे प्रभाकर जोग अशी अनोखी पर्वणी कित्येक पिढय़ांसाठी आनंदाचा ठेवा होती आणि आहे. संगीत क्षेत्राला गाणाऱ्या व्हायोलिनची उणीव भासत राहील.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

*****

प्रभाकर जोग यांच्यासोबत अनेकदा काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांसाठी मी व्हायोलिन वादन केले आहे. त्यांचे व्हायोलिनवादन सुरेल होते. माझ्या व्हायोलिनवादनावर ते खूश असायचे. त्यांचे व्हायोलिन वादन जगभरात लोकप्रिय झाले.

रमाकांत परांजपे, ज्येष्ठ व्हायोलिन वादक

उत्तम व्हायोलिन वादक आणि प्रतिभावान संगीतकार अशी प्रभाकर जोग यांची ख्याती होती. त्यांचे व्हायोलिन वादन बाबूजींनी १९५२ मध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ऐकले. ‘साथ करायला याल का?’ अशी विचारणा बाबूजींनी केली. १९५५ मध्ये पुणे आकाशवाणीवर गीतरामायणाची सुरुवात झाली. त्यातील सर्व गाण्यांच्या सादरीकरणात जोग यांचा सहभाग होता. जोग आणि श्यामराव कांबळे यांनी बाबूजींचे सहायक संगीतकार म्हणून अनेक वर्षे काम केले. मी संगीतबद्ध केलेले ‘सांज ये गोकुळी’ हे गाणे त्यांनी उत्तम रीत्या वाजवले आहे.

श्रीधर फडके, संगीतकार आणि गायक

*****

प्रभाकर जोग यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या व्हायोलिन वादनातून शब्द ऐकू यायचे. स्वरलेखन म्हणजेच साँग नोटेशनला ते महत्त्व द्यायचे.

डॉ. सलील कुलकर्णी, संगीतकार आणि गायक

लोकप्रिय गीते

* स्वर आले दुरूनी

* लपविलास तू हिरवा चाफा

* प्रिया आज माझी

  नसे साथ द्याया

* हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पालीला टिळा

* हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली

* सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का

* आला वसंत ऋतू आला

* शुभंकरोती म्हणा मुलांनो

स्वराधीन आहे जगती..

महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीत रामायणा’ची एक मैफील. बाबूजींच्या गायनाला माझी व्हायोलिनची साथ होतीच. एकामागोमाग एक गीत बाबूजी गात होते. रसिकांमध्ये होते, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे. बाबूजींनी सूर लावला आणि ‘दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा’ हे गीत त्यांनी गायला सुरुवात केली. या गीतानंतर छोटेखानी मध्यंतर झाले. त्यामध्ये पुलंच्या हस्ते कलाकारांचे सत्कार झाले. या वेळी पुलंनी मनोगत व्यक्त केले. जीवनामध्ये प्रत्येकाला दु:ख आहे. त्या अर्थाने तो पराधीन आहे. पण आपल्यामध्ये प्रभाकर जोग ही एकमेव व्यक्ती पराधीन नाही तर ‘स्वराधीन’ आहे.’ पुलंच्या या अनपेक्षित कौतुकाने मी भारावून गेलो. त्या दिवशी मोठा पुरस्कार लाभला, अशीच माझी भावना होती.

(प्रभाकर जोग यांच्या मुलाखतीतील भाग)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Renowned violinist prabhakar jog passes away at