पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाकडून बसचे फेरनियोजन केले जाणार असून, कमी उत्पन्न मिळणाऱ्या मार्गांवरील सेवा बंद केली जाणार आहे. लांब पल्ल्याच्या मार्गांवर सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस सोडण्यात येणार असून, जुन्या बस सेवेतून काढून येत्या वर्षअखेरपर्यंत १५० नवीन बस ताफ्यात दाखल होणार आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘एसटी’ महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागाने महसूल वाढविण्याच्या दृष्टीने फेरनियोजनाचे काम हाती घेतले आहे. पुणे विभागांतर्गत शहर आणि जिल्ह्यात १४ आगार आणि ४२ स्थानके असून, ८५० बस आहेत. यांपैकी ६४ इलेक्ट्रिक (शिवाई), ३६ व्होल्व्हो लक्झरी (शिवशाही) आणि २०० सीएनजी बस आहेत.
‘कमी उत्पन्न मिळणाऱ्या मार्गांची माहिती संकलित करण्यात येत आहे. लांब पल्ल्याच्या मार्गांवर सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस सोडल्या जाणार आहेत. याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. जास्त उत्पन्न मिळणाऱ्या मार्गांवर अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत. याबाबत नवीन वेळापत्रक तयार केले जाणार आहे,’ असे एसटी महामंडळाच्या पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘सध्या ७० नवीन बस विविध आगारांतून लांब पल्ल्यांच्या ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत सुमारे १५० बस ताफ्यात दाखल होणार आहेत. प्रमुख स्थानके आणि आगार या ठिकाणी होणारा देखभाल-दुरुस्ती खर्च, चालक-वाहक यांच्या वेळा आणि वेतन खर्च, सुरक्षिततेच्या अनुषंगाने उपाययोजना, सण आणि सुट्यांच्या कालावधीत प्रवासी संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत ओह. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल.’
स्वारगेट, शिवाजीनगर स्थानकांतून सोडण्यात आलेल्या बसमधून २०२४-२५ या आर्थिक वर्षात महामंडळाला सुमारे ५५ कोटी रुपयांचे मासिक उत्पन्न मिळाले. हे उत्पन्न मासिक ६५ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यासाठी फेरनियोजन सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार तोट्यातील मार्गांवरील बस बंद केल्या जाणार आहेत.- अरुण सिया, नियंत्रक, पुणे विभाग, एसटी महामंडळ