राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आवाहन; सर्वाधिक २७० तक्रारी पुणे जिल्ह्य़ातून

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार १ एप्रिलपासून राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील तसेच महामार्गाच्या पाचशे मीटर अंतरातील मद्यालयांवर बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील अद्यापही छुप्या पद्धतीने मद्यविक्री केली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. त्या पाश्र्वभूमीवर अवैध मद्यविक्री, निर्मिती, साठवण आणि वाहतुकीबाबत आता थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वॉट्स अ‍ॅप क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पाचशे मीटरच्या आतील मद्यविक्री करणाऱ्या आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत अनेक दुकाने बंद केली. त्यानंतर अनेक दुकानदारांनी आपले दुकान, मद्यालय रस्त्याच्या पाचशे मीटर अंतराबाहेर असून संबंधित रस्ते महामार्ग नसल्याचे म्हणणे गेल्या आठवडय़ात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे नोंदवले होते. याबाबत दखल घेत विभागाने व्यावसायिकांना तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले आहे. तसेच ज्या व्यावसायिकांना पाचशे मीटरच्या बाहेर स्थलांतर हवे असेल त्यांना परवानगी दिली जाईल, असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत नव्वद व्यावसायिकांनी स्थलांतरासाठी अर्ज केले आहेत.

बेकायदा मद्याची विक्री होऊ नये, म्हणून स्थलांतर करू इच्छिणाऱ्या नव्वद व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली आहे. हातभट्टी, परराज्यातून येणाऱ्या चोरटय़ा मद्यावर कारवाईसाठी लक्ष केंद्रित करण्यात आल्याचेही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.

इथे करा तक्रार

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ८४२२००११३३ हा वॉट्स अ‍ॅप क्रमांक देण्यात आला असून त्याच्याबरोबरच नियंत्रण कक्षाकडे दूरध्वनीद्वारे १८००८३३३३३३ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये राज्यामध्ये सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्य़ातून आल्या असून त्यातील २७० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. त्याबरोबरच ‘एक्साइज-कम्प्लेंट’ या अ‍ॅपद्वारेही तक्रार नोंदवता येणार आहे.