स्मार्ट सिटी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पुण्याची निवड व्हावी यासाठी आता केंद्राला शहराचा विकास आराखडा सादर करायचा असल्यामुळे त्यासाठी आता मेकँझी या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक त्यासाठी करण्यात आली आहे. मात्र या नव्या अहवालावर दोन कोटी साठ लाखांचा खर्च करण्यापूर्वी आतापर्यंत तयार झालेले जे अहवाल आणि आराखडे महापालिकेच्या कपाटांमध्ये बंद आहेत ते तरी किमान काढले जाणार का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे.
स्मार्ट सिटीसाठी ज्या ९८ शहरांची निवड झाली आहे, त्यात पुण्याचा समावेश असून पहिल्या वर्षी त्यातील २० शहरांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी साठ मुद्यांवर आधारित आराखडा केंद्राला सादर करायचा आहे. या टप्प्यात महापालिका शहरासाठी वाहतूक तसेच अन्य अनेक प्रकारच्या सुविधा कशाप्रकारे देणार आहे व त्यांचे नियोजन काय आहे, याचा तपशील विकास आराखडय़ाच्या माध्यमातून सादर करायचा आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी मेकँझी या कंपनीला काम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी मंजूर केला. या आराखडय़ासाठी कंपनीला दोन कोटी साठ लाख रुपये दिले जातील.
दरम्यान, हा आराखडा तयार होण्यापूर्वी महापालिकेने आतापर्यंत कोटय़वधी रुपये खर्च करून जे अनेक आराखडे वेळोवेळी तयार करून घेतले आहेत त्यांचा विचार नव्या आराखडय़ात होणार का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. विकासाच्या अनेक योजना जाहीर करून तसेच शहरवासियांसाठी अनेक घोषणा करून महापालिकेने त्यासाठी वेळोवेळी खासगी कंपन्यांकडून वा सल्लागारांकडून अहवाल तयार करून घेतले आहेत. त्यातील बहुतेक सर्व अहवाल बंदिस्त असून त्यांची अंमलबजावणी अनेक वर्षांत झालेली नाही.
जुन्या हद्दीचा विकास आराखडा महापालिकेने तयार केला असून हा आराखडा सध्या अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे. त्या बरोबरच तेवीस गावांचा विकास आराखडाही राज्य शासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे शहराची जुनी हद्द आणि तेवीस गावे यांचे आराखडे महापालिकेकडे आहेत. त्या बरोबरच बहुचर्चित मेट्रोचाही आराखडा तयार करून घेण्यात आला असून हा आराखडा राज्य शासनाकडून मंजूर झाला असून तो अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे गेला आहे. नदीसुधारणेसाठीचा आराखडाही केंद्राने गेल्याच महिन्यात मंजूर केला आहे. त्यासाठी जपानच्या जायका कंपनीकडून महापालिकेला ९०० कोटींचे अनुदान मिळणार आहे. शहरात टेकडय़ांचा विषय नेहमीच गाजला आहे. त्यासाठीचेही आराखडे दोनदा करून घेण्यात आले आहेत. सी-डॅक आणि मोनार्च या दोन संस्थांकडून टेकडय़ांचे आराखडे तयार करून घेण्यात आले आहेत. मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठीचाही अहवाल महापालिकेत तयार आहे.
या अहवालांबरोबरच शहराच्या वाहतूक सुधारणेसाठी एकात्मिक वाहतूक आराखडाही तयार करण्यात आला आहे. त्याबरोबरच शहरातील विविध भागांमध्ये जे बीआरटी मार्ग विकसित करण्याची योजना आहे त्यासाठीचा बीआरटीचाही अहवाल तयार आहे. पुणे आणि िपपरी तसेच उपनगरांच्या बाहेरून आखण्यात आलेला रिंगरोडचाही आराखडा तयार आहे. तसेच जुन्या शहरातील वाहतूक सुधारणेसाठी उपनगरांना जोडणाऱ्या जलदगती मार्गाचाही आराखडा महापालिकेत तयार आहे. शहराशी संबंधित अनेक प्रश्नांबाबतचे तसेच विकासकामांचे अहवाल तयार झालेले असताना त्यांचा उपयोग न करून घेता नवा विकास आराखडा तयार करण्यासाठी आता मेकँझी कंपनीला काम दिले जात आहे.