पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण रविवारी निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठीचा कार्यक्रम महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून जाहीर करण्यात आला आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मंगळवारी (३१ मे) सकाळी दहा वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. सर्वोच्च न्यालयाच्या आदेशानुसार आगामी निवडणूक इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाशिवाय होणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठीचे प्रभागही निश्चित करण्यात आले आहेत. या प्रभागांमध्ये महिलांसाठीचे राखीव जागांवरील आरक्षण निश्चित केले जाणार आहे. आरक्षण सोडतीसाठी राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, इच्छुकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

आरक्षण सोडत मंगळवारी झाल्यानंतर आरक्षणाचे प्रारूप बुधवारी (१ जून) प्रसिद्ध केले जाईल. त्यानंतर एक जून ते सहा जून (दुपारी तीन ) या कालावधीत आरक्षणाबाबत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. महापालिकेची आगामी निवडणूक पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) होणार आहे. शहरासाठी एकूण ५८ प्रभाग असून त्यापैकी ५७ प्रभागात तीन नगरसेवक तर एका प्रभागात दोन नगरसेवक असतील. एकूण १७३ नगरसेवक महापालिकेत जाणार असून त्यापैकी ८७ जागा महिलांसाठी राखीव आहेत. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, निवडणूक शाखेचे उप आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी गणेश कला क्रीडा रंगमंचाची पाहणी केली आहे. महिला आरक्षण निश्चित झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reservation draw for pmc election on tuesday pune print news zws
First published on: 26-05-2022 at 17:28 IST