राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के जागा राखीव ठेवण्याचा नियम आहे. विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा ठेवण्याबाबतच्या नियमाची वारंवार आठवण शिक्षण विभागाकडून करून देण्यात येत असते. प्रत्यक्षात मात्र या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणसंस्थांमध्ये पुरेशा सुविधाच उपलब्ध नाहीत.
राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश क्षमतेच्या ३ टक्के जागा अपंग विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवणे आवश्यक आहे. याबाबत न्यायालयानेही अनेक आदेश दिले आहेत. या नियमाचे बहुतेक शिक्षणसंस्थांकडून पालन होतच नाही. त्यामुळे उच्च शिक्षण विभाग, तंत्रशिक्षण विभागाकडून महाविद्यालयांना सातत्याने स्मरणपत्र पाठवण्यात येतात. अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कागदोपत्री प्रोत्साहन देताना महाविद्यालयांमध्ये त्यांच्यासाठी पुरेशा आणि आवश्यक सुविधा आहेत का, याची पाहणीच केली जात नाही.
अपंग विद्यार्थ्यांमध्ये नियमित विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या महाविद्यालयात अंध आणि अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असते. अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा म्हणजे महाविद्यालयात रॅम्प बांधणे एवढाच विचार महाविद्यालयांकडून केला जातो. महाविद्यालयांची पाहणी करतानाही रॅम्प आहे का याचीच पाहणी केली जाते. प्रत्यक्षात रॅम्प आणि लिफ्ट ही अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक आवश्यकता आहे. मात्र, बहुतेक महाविद्यालयांमध्ये त्याचाही अभाव असल्याचेच दिसून येते. त्या शिवाय या विद्यार्थ्यांसाठी वेगळी स्वच्छतागृहे, लेखनिका सारख्या सुविधा याचीही आवश्यकता असते. मात्र, त्याची गणतीच होत नाही. अंध आणि अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त बोलण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी अक्षम असलेल्या विद्यार्थ्यांनाही नियमित विद्यार्थ्यांबरोबर शिकण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यासाठी महाविद्यालयांमध्ये काही वेळा विशेष प्रशिक्षकांची आवश्यकता असते, या घटकाचा विचारही केला जात नाही.
शिक्षणसंस्थांच्या आवारात विविध शासकीय विभागांच्या परीक्षा, प्रवेश परीक्षा होत असतात. या परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांनाही शिक्षणसंस्थांच्या इमारतीमध्ये पुरेशा सुविधा नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर महाविद्यालयातील सुविधांबाबत माहिती देणे अपेक्षित असताना, या विद्यार्थ्यांसाठी काय सुविधा दिल्या आहेत त्याचे तपशील दिले जात नाहीत. त्यामुळे बहुतेक वेळा प्रवेश घेतल्यानंतरच महाविद्यालयातील गैरसोयीची कल्पना विद्यार्थ्यांना येते.

‘‘मी कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. महाविद्यालयात रॅम्प आहे. त्याचा आधार घेऊन महाविद्यालय अपंग विद्यार्थ्यांसाठी सुविधा पुरवत असल्याची माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली होती. मात्र, वेगळ्या प्रकारची स्वच्छतागृहे नाहीत. महाविद्यालयात प्रवेश करताना रॅम्प आहे मात्र, वरील मजल्यांवर जायचे असल्यास लिफ्टमन नसल्यामुळे लिफ्टची सुविधा वापरता येत नाही.’’
                                                                                                     – कविता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reservations students disabilities facilities
First published on: 01-09-2015 at 03:15 IST