पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जुन्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी कायम ठेवताना नव्याने काही जबाबदारी दिली जाणार आहे. त्यासाठी संघटनेत फेरबदल होणार असून, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत त्या संदर्भात येत्या सोमवारी (९ जून) बैठक होण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका तातडीने घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिले होते. त्यामुळे रखडलेल्या निवडणुका होण्याचा मार्गही मोकळा झाला असून, सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारीही सुरू करण्यात आली आहे. ‘मनसे’कडूनही तयारी सुरू झाली असून, संघटना आणि बूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत येत्या सोमवारी बैठक होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत सर्व शाखाप्रमुख बदलणार असल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे. त्याचबरोबर गटप्रमुखांच्याही नवीन नियुक्त्या करण्यात येणार आहे. तसेच शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी नव्याने काही नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता आहे. त्याद्वारे पक्षाची संघटनात्मक बांधणी सक्षम आणि मजबूत करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
संघटनेत फेरबदल होणार नाहीत. जुन्या पदाधिकाऱ्यांकडून पदे काढून घेतली जाणार नाहीत. मात्र, काही पदाधिकाऱ्यांना नव्याने जबाबदाऱ्या दिल्या जातील. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये येत्या काही दिवसांत बैठक होईल. – राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, प्रदेश सरचिटणीस, मनसे