पुणे : राज्य कुस्तीगीर परिषदेची मान्यता आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन यावरून मैदानाबाहेर वेगळाच आखाडा रंगला आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेची संलग्नता टिकविण्यासाठी १९८४ पासून अध्यक्षपदावर असलेल्या शरद पवार यांच्यासह राज्य कुस्तीगीर परिषदेच्या चार पदाधिकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने बाळासाहेब लांडगे यांची संघटना अधिकृत असल्याचे सांगितले होते. त्याच वेळी भारतीय कुस्ती महासंघाने नवा डाव खेळताना राज्य कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस राज्य कुस्तीगीर परिषदेला दिली. या नोटिशीनंतर राज्य कुस्तीगीर परिषद आणि भारतीय कुस्तीगीर महासंघ यांच्यात केवळ पत्रव्यवहार चालू असल्याचे समजते. 

या दरम्यान राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक तत्त्वांनुसार वयाची ७० वर्षे पूर्ण केलेल्या राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गेल्या आठवडय़ात बारामती हॉस्टेलवर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते. यानुसार शरद पवार, नामदेव मोहिते, बाळासाहेब लांडगे, सुरेश पाटील या चौघांनी राजीनामा दिला. अर्थात, यावर अधिकृतपणे कुणीही बोलण्यास तयार नव्हते. बाळासाहेब यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

‘महाराष्ट्र केसरी’ हंगामी समितीकडेच

राज्य कुस्तीगीर परिषदेची मान्यता टिकविण्यावरून झालेल्या राजीनामा नाटय़ानंतरही भारतीय कुस्तीगीर महासंघाने राज्य कुस्तीगीर परिषदेचा कार्यभार हंगामी समितीकडेच सोपविला असून, त्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या यजमानपदाचा मान माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानला दिल्याचे जाहीर केले. ही स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीत पुण्यात होईल, असे मोहोळ यांनी सांगितले.

‘महाराष्ट्र केसरी’चा मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’ला

पुणे : महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेच्या असणाऱ्या ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’ला मिळाला आहे. या संदर्भात कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानला दिल्याचे पत्र भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष, खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून स्वीकारल्याची माहिती संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाण लवकरात लवकर कळवण्याची सूचना या पत्रात कुस्ती महासंघाने केली आहे.  नवी दिल्ली येथे बृजभूषण सिंह यांनी यांनी मोहोळ यांना हे पत्र दिले. या वेळी राज्य कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके उपस्थित होते. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांना या स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले असून, ते त्यांनी स्वीकारले असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resignation of office bearers of state kustigir parishad including sharad pawar pune news ysh
First published on: 10-12-2022 at 00:56 IST