पिंपरी : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात उपाहारगृहे (रेस्टॉरंट्स) सुरू होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्याने हॉटेलचालक वर्ग सुखावला आहे. त्याचवेळी, गेल्या सात महिन्यांचे थकित भाडे भरण्याच्या मुद्दय़ावरून त्यांच्यात मोठी चिंताही दिसून येते. पिंपरी-चिंचवड शहरात लहान मोठी जवळपास चार हजार उपाहारगृहे आहेत. जेमतेम व्यवसाय करणाऱ्यांपासून दररोज लाखोंचे उत्पन्न मिळवणारे चालक यात  आहेत. बहुतांश उपाहारगृहे भाडेदराने घेतलेल्या जागांवर उभारलेली आहेत. शासनाने मार्च महिन्यात टाळेबंदी लागू केली, तेव्हापासून सर्व प्रकारची उपाहारगृहे बंद आहेत. तेव्हापासून या व्यावसायिकांचे अर्थकारण कोलमडले आहे. चालकांना विविध कर, उत्पादन शुल्क, परवान्यांचे नूतनीकरण, जागेचे भाडे, कामगारांचे पगार, देखभाल दुरुस्ती,  वीज बील, बँकांच्या हप्त्यांसह इतर देणी आहेत. उत्पन्नाचे मार्ग मात्र बंद झाले आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या व्यावसायिकांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती सातत्याने सत्ताधारी नेत्यांकडे केली होती. आतापर्यंत काहीही हालचाली होत नसल्याने हा वर्ग हवालदिल होता. सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर उपाहारगृह चालकांना आशेचा किरण दिसू लागला आहे. दुसरीकडे, सात महिन्यांपासून अनेकांनी जागामालकांना भाडे दिलेले नाही.