आरोग्य विभागाच्या गट क परीक्षेचा निकाल, उमेदवार नियुक्तीच्या वेळापत्रकावर आक्षेप

आरोग्य विभागातील गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांसाठी खासगी कंपनीमार्फत ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेऊन पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील गट क संवर्गाच्या लेखी परीक्षेचे निकाल जाहीर करून निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबरपासून गुणवत्ता यादी जाहीर करणे आणि पुढील प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे परिपत्रक आरोग्य विभागाने काढले आहे. मात्र परीक्षांदरम्यान झालेल्या गोंधळाची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याने गट क संवर्गाच्या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यासह पुढील प्रक्रिया आरोग्य विभाग कशी काय राबवू शकतो, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 

आरोग्य विभागातील गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांसाठी खासगी कंपनीमार्फत ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेऊन पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली. या परीक्षांपूर्वी आणि परीक्षांच्या दिवशी झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोंधळाबाबत उमेदवारांनी आवाज उठवला होता. एमपीेएससी समन्वय समितीमार्फत पेपरफुटीबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. त्यामुळे या परीक्षांचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

या पार्श्वभूमीवर गट क संवर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत आणि निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतचे वेळापत्रक असलेले परिपत्रक शनिवारी समोर आले. त्यानंतर एमपीएससी समन्वय समितीचे सचिव नीलेश गायकवाड यांनी या आरोग्य विभागाच्या या प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवला. ‘आरोग्य विभागाच्या गट ड आणि गट क परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. गट ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार एमपीएससी समन्वय समितीने दाखल केल्यानंतर पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे. गट क परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीची तक्रार आम आदमी पक्षाकडून पुणे पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली. असे असताना निकाल जाहीर करणे आणि नियुक्ती देण्याची घाई आरोग्य विभाग करत आहे. पोलिस तपास संपेपर्यंत या दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येऊ नये, अशी लेखी मागणी आरोग्य विभागाकडे केली आहे. आरोग्य विभागाने निकाल जाहीर केल्यास तीन ते चार दिवसांत राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल. तसेच या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दोन्ही परीक्षांतील प्रश्नपत्रिका फुटीचे पुरावे न्यायालयात दिले जातील, असे गायकवाड यांनी सांगितले.

गट क संवर्गातील ज्या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज केला होता, त्या पदापेक्षा वेगळ्या पदाची प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमेदवारांची लवकरच पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. त्या बाबतची प्रक्रिया आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत आहे. त्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. वेगळी प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमेदवारांनी ज्या कार्यालयासाठी अर्ज केला असेल, त्या पदाचा अंतिम निकाल पुनर्परीक्षा झाल्यानंतरच जाहीर करण्यात येईल. उर्वरित पदांसाठीची निवड प्रक्रिया राबवण्याबाबतचे वेळापत्रक विभागाने तयार केले आहे. पोलिसांकडून करण्यात येत असलेली चौकशी गट ड संवर्गाच्या परीक्षेबाबत आहे. त्यामुळे त्या परीक्षेच्या पुढील प्रक्रियेबाबतची कार्यवाही विभागाकडून सध्या सुरू नाही.   – डॉ. अर्चना पाटील, संचालक, आरोग्य विभाग

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Result of group c examination of health department objection to the schedule akp

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार
ताज्या बातम्या