पुणे : शहरातील रस्त्यांची सद्य:स्थिती, रस्त्यांची एकूण लांबीची निश्चित माहिती संकलित करण्यासाठी महापालिकेकडून शहरातील रस्त्यांचे पुन्हा सर्वेक्षण केले जाणार आहे. सहा वर्षांनंतर असे सर्वेक्षण करण्यात येणार असून, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांचे तांत्रिक विश्लेषण करून रस्तेदुरुस्ती आणि देखभालीचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी साडेचार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पुढील दीड ते दोन वर्षांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
शहरात एक हजार ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जाळे आहे. यामध्ये सिमेंट, डांबरी रस्त्यांचा समावेश आहे. महापालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश झाल्याने या गावातील २०० ते ३०० किलोमीटर लांबीचे रस्ते महापालिका हद्दीत आले आहेत. त्यामुळे शहराच्या हद्दीत किती किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत, याची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी रस्त्यांचे फेरसर्वेक्षण करण्यात येणार आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहन संख्येचा विचार करता प्रत्येक वर्षी रस्ता रुंदीकरण आणि नवीन रस्ते झाले, याची माहिती सर्वेक्षणात निश्चित होणार आहे.




हेही वाचा >>> पुणे : फिरत्या हौदांकडे पुणेकरांची पाठ! करदात्यांचे एवढे कोटी खर्च
गुगल स्ट्रीचच्या धर्तीवर अत्याधुनिक कॅमेरे असलेले वाहन त्यासाठी वापरण्यात येणार आहे. लेझर सेन्सरच्या माध्यमातून रस्त्यावरील खड्डे तसेच रस्त्याचा उतार आणि गुणवत्तेची तपासणी होणार आहे. प्रत्येक पाच किलोमीटर अंतराचे छायाचित्र घेतले जाणार असून, अक्षांश आणि रेखांश निश्चित केला जाणार आहे. चित्रीकरणामुळे रस्त्यावरील चेंबर, पावसाळी वाहिन्या, खड्डे यांची माहितीही मिळणार असून त्यानुसार रस्ते दुरुस्तीचा प्राधान्यक्रमही महापालिकेला निश्चित करता येणार आहे. रस्त्यालगतच्या पदपथांचे मोजमापही कळणार आहे.
हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमधील झोपड्यांना ‘गुगल प्लस कोड’
सर्वेक्षणाच्या माध्यमातून संकलित माहितीनुसार रस्त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे. त्यानुसार एक ते पाच अशा श्रेणीमध्ये रस्त्यांची विभागणी होणार असून, त्या श्रेणीतील रस्त्यासाठी निधीचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच पाणीपुरवठा, मल:निस्सारण, विद्युत विभागाच्या कामांमुळे रस्त्याची वारंवार होणारी खोदाई टाळता येणार असून, रस्ते खड्डेविरहित ठेवण्यास मदत होईल, असा दावा महापालिकेच्या पथ विभागाकडून करण्यात आला आहे. महापालिकेच्या जीआयएस प्रणालीमध्ये ही सर्व माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे.
रस्त्याची लांबी, रुंदी, प्रकार, पदपथ, सायकल मार्ग आदीची माहिती या माध्यमातून अद्ययावत होणार आहे. रस्त्यांवर विविध तांत्रिक चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यातून रस्त्याची गुणवत्ता आणि वाहकक्षमताही तपासली जाईल. रस्त्यांच्या दुरुस्तीच्या थरांची जाडी निश्चित करता येणार आहे. – व्ही. जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका