पुणे : जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने एका निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताने व्यावसायिकाची दोन कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निवृत्त सहायक पोलीस आयुक्तासह पत्नी, मुलगा यांच्यासह पाचजणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक हे हडपसरमधील मांजरी परिसरात राहायला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सहायक पोलीस आयुक्त पुणे ग्रामीण, तसेच पुणे शहर पोलीस दलात नियुक्तीस होते.
तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. सहायक आयुक्तांंनी २०२६ मध्ये खेड तालुक्यातील बोरज येथे मोक्याच्या ठिकाणी मुंबईतील एका व्यावसायिकाची १२ एकर जमीन आहे. मुंबईतील व्यावासायिकाला जमिनीची विक्री करायची आहे, असे व्यावसायिकाला सांगितले होते. ही जमीन खरेदी केल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा हो्ईल, असे व्यावसायिकाला सहायक आयुक्तांनी सांगितले होते.
त्यानंतर सहायक आयुक्तांनी मुंबईतील एका व्यवासायिकाच्या नावे एका बँकेत खाते उघडले. तक्रारदाराकडून ५० लाख रुपये घेण्यात आले, तसेच सोलापूर येथील एका बँकेत खासगी कंपनीच्या नावे बनावट खाते उघडून आरटीजीएस सुविधेद्वारे २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून व्यावसायिकाकडून पैसे घेण्यात आले. त्यानंतर खरेदीखत करायचे असल्याचे सांगून सहायक आयुक्ताने तक्रारदार व्यावसायिकाकडून एक कोटी ३५ लाख रुपये रोख स्वरुपात घेतले.
खेडमधील जमीन मुंबईतील एका व्यावसायिकाची होती. मुंबईतील व्यावसायिक हताय असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगून व्यवहार पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर तक्रारदार व्यावसायिकाने सहायक आयुक्तांकडे पैसे परत मागितले. तेव्हा त्यांनी टाळाटाळ सुरू केली. पैसे मागितल्यानंतर त्यांना धमकावले, असे व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सहायक आयुक्तांनी पत्नी आणि मुलाच्या खात्यात काही रक्कम जमा केल्याचे तपासात उघडकीस आले. या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.
