पिंपरी : पिंपरी महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या सहशहर अभियंता पदावरून निवृत्त झालेल्या प्रवीण लडकत यांनाच या विभागाच्या सल्लागारपदी नियुक्त करण्यात आले आहे. यासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आल्याचा देखावा पालिकेने केला. प्रत्यक्षात एकमेव अर्ज प्राप्त झाल्याचे सांगत मुलाखतही न घेता लडकत यांची वर्णी लावण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात लडकत सेवानिवृत्त झाले. तेव्हापासूनच त्यांचे या विभागात परतण्याचे प्रयत्न सुरू होते. पाणीपुरवठा सेवेत सल्लागार हवा म्हणून पालिकेने निवड प्रक्रिया राबवण्याचा देखावा केला. १६ मार्चला जाहिरात देऊन अर्ज मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र लडकत यांचाच एकमेव अर्ज प्राप्त झाल्याचे सांगून त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. लडकत यांची मुलाखतही घेण्यात आली नाही. गुरुवारी (७ एप्रिल) प्रशासक राजेश पाटील यांनी, त्यांच्या प्रशासकीय अधिकारात लडकत यांना एकत्रित मानधनावर नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा लडकत यांच्या नियुक्तीला विरोध असल्याचे सांगण्यात येते.

सर्वच अधिकारी अपयशी

पिंपरी-चिंचवडला मुबलक पाणीसाठा असतानाही पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात अपुरा, दूषित आणि विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून शहरात पाणीकपात सुरू आहे. त्याअंतर्गत शहरवासीयांना दिवसाआड पाणी देण्यात येत आहे. प्रवीण लडकत यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी या विभागाची जबाबदारी सांभाळली. मात्र, कोणालाही पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश आलेले नाही.