पुणे : पत्नी, सासू आणि मेव्हण्याच्या मारहाणीत निवृत्त सैनिकाचा मृत्यू; कागदपत्रे घेऊन काढला पळ

नातेवाईकांना यासंदर्भात माहिती दिल्यानंतर त्यांनीही कोणताही प्रतिसाद दिला नाही

Retired soldier beaten to death by wife mother in law

पुण्यातील लोहगाव परिसरात राहणार्‍या निवृत्त सैनिकाचा पत्नी, सासू आणि मेव्हण्यांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद जाधव (३९) असे मयत पतीचे नाव आहे. तर पत्नी ज्योती जाधव, सासू सुषमा जाधव आणि मेव्हणा राकेश दळवी, कैलास दळवी मेव्हणा अशी चार आरोपींची नावे आहेत.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रमोद रघुनाथ जाधव हे सैन्य दलातून निवृत्त झाले होते आणि त्यांना तीन मुले आहेत. पती रघुनाथ आणि पत्नी ज्योती यांच्यात गेल्या वर्षापासून सतत छोट्या छोट्या कारणावरून वाद होत होते. त्यामुळे वर्षभरापासून पत्नी ज्योती या पतीपासून वेगळ्या राहत होत्या.

 त्याच दरम्यान मुलांच्या शाळेसाठी काही कागदपत्र हवी असल्याने ज्योती प्रमोद यांच्या घरी गेल्या होत्या. मात्र पती प्रमोद यांनी ज्योती यांना घरात घेतले नाही. त्यावरून दोघांमध्ये भांडण देखील झाली. काही वेळाने पत्नी ज्योती, सुषमा दळवी राकेश दळवी आणि कैलास दळवी यांच्या सोबत पुन्हा घरी गेल्या.

त्यावेळीही त्या सर्वांना पती प्रमोद यांनी विरोध करत शिवीगाळ केली. त्यानंतर चार ही जणांनी प्रमोद यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर पत्नी ज्योती यांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन निघून गेल्या. या मारणीत प्रमोद हे गंभीर जखमी अवस्थेत पडून राहिले. त्यानंतर त्यांच्या घराकडे कोणी ही फिरकले नाही. प्रमोद यांच्या नातेवाईकांना एका शेजाऱ्याने फोन करुन यासंदर्भातील माहिती दिली. मात्र कोणीही त्याला प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी प्रमोद हे बेशुद्ध अवस्थेत पडून होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रमोद यांना मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले असून चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Retired soldier beaten to death by wife mother in law abn 97 svk

Next Story
पुणे: “उशीर झालाय घरी जाऊ नकोस,” वाढदिवसाच्या पार्टीला बोलवून महिलेवर बलात्कार; नंतर विवस्त्र करून विनयभंग
फोटो गॅलरी