देशातील असहिष्णुतेचे वातावरण आणि साहित्यिकांची पुरस्कार वापसी या महत्त्वाच्या विषयांसंदर्भात ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील परिसंवादातून थेटपणाने भाष्य करण्याला बगल देण्यात आली आहे. मात्र, हे विषय टाळलेले नाहीत, तर परिसंवादाच्या विषयांमध्ये त्याचा अंतर्भाव सूचकपणे करण्यात आला असल्याचा दावा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी केला आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीतर्फे १५ ते १८ जानेवारी या कालावधीत हिंदूुस्थान अँटिबायोटिक्स मैदानावर हे संमेलन होणार आहे.
देशातील असहिष्णू वातावरणामुळे साहित्यिकांनी पुरस्कार परत केले आहेत. यासंदर्भात साहित्य महामंडळाची भूमिका काय, असे डॉ. माधवी वैद्य यांना विचारले असता, साहित्यिक भूमिका घेत असून हे चांगले लक्षण असल्याचे मत व्यक्त केले होते. या विषयांचे प्रतिबिंब साहित्य संमेलनातील परिसंवादामध्ये उमटेल, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये परिसवांदांच्या विषयांची माहिती देताना असहिष्णू परिस्थिती आणि पुरस्कार वापसी या विषयांना बगल दिली असल्याचे उघड झाले. परिसंवादाचे विषय नीटपणे पाहिले तर या विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे, असा दावाही त्यांनी केला.
वेगवेगळ्या विषयांवर आठ परिसंवाद, निमंत्रितांची दोन कविसंमेलने, बहुभाषिक कविसंमेलन, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांशी संवाद, तीन मुलाखती आणि तीन सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना संमेलनातून मिळणार आहे. महामंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत संमेलनाच्या तारखा आणि कार्यक्रमांची रुपरेषा निश्चित करण्यात आली. मात्र, परिसंवादामध्ये सहभागी होणारे वक्ते आणि निमंत्रित कवी यांची नावे नंतर जाहीर होणार असल्याची माहिती वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाचे उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, सदस्या शुभदा फडणवीस, संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर या वेळी उपस्थित होत्या.
घुमान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते १५ जानेवारी रोजी निघणाऱ्या ग्रंथिदडीचे आणि ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. १६ जानेवारी रोजी संमेलनाचा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. संमेलनात ‘मराठी समीक्षा किती संपन्न, किती थिटी’, ‘मराठी वाङ्मयातील पुरस्कारांचे सांस्कृतिक आणि सामाजिक स्थान’, ‘१९८० नंतरची मराठी कविता स्त्रीकेंद्रित आहे’, ‘मराठी भाषेत व्यवहार आणि व्यवहारातील मराठी’, ‘अभिरुचीसंपन्न विनोद आणि आजचे मराठी साहित्य’, ‘माध्यमांतील स्त्रीप्रतिमा आणि भारतीय संस्कृती’, ‘आजची तरुणाई काय वाचते, काय लिहिते’, ‘श्रमिक महिलांच्या व्यथा आणि लेखकांच्या कथा’, ‘उद्योग जगताचे चित्र आणि महाराष्ट्रातील उद्योग’, ‘बदलते सामाजिक-राजकीय अस्तित्व आणि दलित-ग्रामीण साहित्य’ या विषयांवर परिसंवाद होणार आहेत. कथाकथन आणि मराठी अभिजात कथांचे वाचन असे दोन कार्यक्रम होणार आहेत.
दोन प्रकारचे प्रतिनिधी शुल्क
साहित्य संमेलनासाठी दोन प्रकारचे प्रतिनिधी शुल्क आकारले जाणार आहे. भोजन आणि निवासव्यवस्था या दोन्ही सुविधांसाठी दोन हजार रुपये, तर केवळ भोजनाची सुविधा हवी असणाऱ्यांसाठी बाराशे रुपये प्रतिनिधी शुल्क ठेवण्यात आले आहे. १ ते ३० डिसेंबर या कालावधीत विद्यापीठ आवारातील संमेलन कार्यालय, पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाचे कार्यालय येथे प्रतिनिधी नोंदणीचे अर्ज उपलब्ध होणार असल्याची माहिती सचिन इटकर यांनी दिली. ग्रंथप्रदर्शनामध्ये ५०० गाळ्यांचा समावेश असून एका गाळ्यासाठी पाच हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. प्रतिनिधी शुल्क आणि ग्रंथप्रदर्शनातील गाळ्यांतून जमा होणारा निधी हा दुष्काळग्रस्तांसाठी कार्यरत असलेल्या नाम फाउंडेशनला देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.