पिंपरी : ताथवडे येथील राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीची विनापरवानगी खरेदी-विक्री करण्यात आल्याची कबुली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली. हे दस्त नोंदविणाऱ्या प्रभारी दुय्यम निबंधक विद्या बडे-सांगळे आणि वरिष्ठ लिपिकाला निलंबित केल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

भाजपचे विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. ताथवडेतील पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या जमीन खरेदी-विक्रीकरिता पूर्वपरवानगी आवश्यक असतानासुद्धा शासनाच्या परवानगीशिवाय जमिनीची खरेदी-विक्री करण्यात आली. हवेली क्रमांक १७ उपनोंदणी कार्यालयातील सहायक दुय्यम निबंधक आणि वरिष्ठ लिपिक यांच्याशी संगनमत करुन संबंधित मालमत्तेचा खरेदीखत दस्त नोंदविण्यात आला आहे. या जमिनीचा मूळ मालक मृत असताना आणि वारसांची नोंद नसतानाही तांत्रिक अडचण दाखवून स्किप पर्यायाचा गैरवापर करुन संबंधित विकसकाला चुकीच्या पद्धतीने जमिनीची दस्त नोंदणी करुन देण्यात आली आहे का, याप्रकरणी शासनाने चौकशी करुन संबंधित दोषी अधिकारी व विकसक यांच्याविरुद्ध कोणती कारवाई केली किंवा करण्यात येत आहे, असे विविध प्रश्न गोरखे यांनी विचारले होते.

त्याला महसूलमंत्री बावनकुळे यांनी लेखी उत्तर दिले आहे. बावनकुळे यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, ताथवडे येथील राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीची विनापरवानगी खरेदी-विक्री करण्यात आल्याचे खरे आहे. मूळ मालक मृत असताना आणि वारसांची नोंद नसतानाही तांत्रिक अडचण दाखवून स्किप पर्यायाचा गैरवापर करुन संबंधित विकसकाला चुकीच्या पद्धतीने जमिनीची दस्त नोंदणी करुन देण्यात आल्याचे खोटे आहे.

हवेलीतील सह दुय्यम निबंधक १७ कार्यालयात हा दस्त खरेदीखत नोंदणी करण्यापूर्वी पक्षकारांमध्ये मिळकतीचे साठेखत सह दुय्यय निबंधक हवेली क्रमांक २२ या कार्यालयात ६ ऑगस्ट २०२३ रोजी दस्त नोंदविण्यात आले आहे. त्यावेळी वार्षिक बाजार मुल्य तत्क्यानुसार १६ कोटी ६२ लाख १६ हजार रुपये बाजारमुल्य आणि मोबदला ३३ कोटी रुपये या रकमेवर दोन कोटी ३१ लाख रुपये मुद्रांक शुल्क साठेखतावर आकारण्यात आले आहे. त्यामुळे खरेदीखताच्या दस्तऐवजास ५०० रुपये मुद्रांक शुल्क लावण्यात आले. त्यामुळे खरेदीखताचा दस्त नोंदविताना मुद्रांक शुल्काचे नुकसान झाले नाही. मात्र, मिळकतीच्या अद्यावत सातबारा उताऱ्याची पाहणी न करता तसेच अद्यावत सातबारा उतारा जोडून न घेता नोंदविला आहे.

मिळकतीच्या चालू सातबारा उताऱ्यावर पशुसंवर्धन आयुक्त यांचा ताबा असे शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय खरेदी विक्रीस बंदी असा शेरा नमदू आहे. असे असतानाही दस्ताची नोंदणी केल्याने हे दस्त नोंदविणाऱ्या प्रभारी दुय्यम निबंधक विद्या बडे-सांगळे आणि वरिष्ठ लिपिकाला १३ नोव्हेंबर २०२५ रोजी निलंबित करण्यात आले आहे. तसेच संबंधितांवर दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौकशी सुरु असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.