पुणे : जिल्ह्यातील मावळमधील नवलाख उंबरे या गावातील जमीन शासकीय आहे, की खासगी मालकीची याबाबत चौकशी करण्यात यावी. तसेच, या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर १५ दिवसांत कारवाई करावी, असा आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्यांनी हा आदेश दिला. या बैठकीला आमदार अमित गोरखे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. गोरखे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
शासकीय जमीन कोणी खासगी असल्याचे म्हणत असेल, तर ते चुकीचे आहे. शासकीय जमिनीवर खासगी व्यक्तीने नावे लावून त्याची विक्रीही केली आहे. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश बावनकुळे यांनी दिले.
सरकारी जमीन खासगी लोकांना देऊन मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार गोरखे यांनी केला आहे. खासगी विकासकाने प्लॉट पाडून या जमिनीची विक्री केल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये अधिकाऱ्यांचाही सहभाग असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. तर याप्रकरणी सूर्यकांत मोरे या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी करण्यात आली आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.