लोकसत्ता वार्ताहर बारामती: राज्याच्या विविध भागात झालेल्या दंगली हे सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुटप्पी भूमिका या निमित्ताने राज्याच्या जनतेच्या समोर आली, अशी टीका करतानाच विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस बारकाईने परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी बारामतीमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार जयकुमार गोरे या वेळी उपस्थित होते. आणखी वाचा- मुंबईत विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय विखे पाटील म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहण्याचे प्रकार घडले. मात्र, महाविकास आघाडी शांत राहिली आणि आत्ता ते आम्हाला ब्रह्मज्ञान शिकवत आहेत. औरंगजेबाची छायाचित्रे घेऊन नाचण्याचे धाडस केले जात आहे, त्याबद्दल मात्र महा विकास आघाडीचे नेते काहीही बोलत नाहीत. तेथे मात्र ते गप्प आहेत. ही त्यांची दुटप्पी भूमिका आता जनतेसमोर येत आहे.