पुणे : शरद पवार साहेब जेष्ठ नेते आहेत. सध्या पाऊस कमी झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे पवार दुष्काळी भागात दौऱ्यावर गेले असते तर समजू शकलो असतो. पण ते जालन्यात गेले. तेथे जाऊन राजकारण करणे योग्य नाही. त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामा मागण्याचा पवार यांना नैतिक अधिकार नाही. पवार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणसाठी काय केले? , अशा शब्दांत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
पुणे दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, की कालची घटना राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. सर्वांनी शांतता ठेवावी. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने हा विषय हाताळला होता, अतिशय सकारात्मक खंबीर भूमिका त्यांनी घेतली होती. महाविकास सरकारने हे आरक्षण घालवले तेच राजकारण करत आहेत. त्यांनी सतत नकारात्मक भूमिका घेतली आहे. समाजाला जाऊन भडकवण्याचा प्रकार करत आहेत. ज्या-ज्या ठिकाणी बंदची हाक दिली आहे, तेथे शांतता राखावी. या प्रकरणी विरोधकांनी राजकारण थांबवले पाहिजे.




हेही वाचा >>>मराठा समाजाच्या वतीने दिघीमध्ये निदर्शने
मराठा समाजाला आधार देण्याचे काम केले पाहिजे, आधार देण्याचे काम करत असतील,तर त्याला आमचा विरोध नाही. ज्यावेळी आरक्षण घालवले त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. मराठा आरक्षण घालवल्याबद्दल.उद्धव ठाकरेंनी प्रायचित्त करून घ्यावे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा >>>शाळेची बनावट तुकडी दाखवून शासकीय अनुदान लाटण्याचा प्रयत्न; तत्कालीन उपशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा
उद्धव ठाकरे यांनी काय दिवे लावले हे लोकांना कळले पाहिजे. सरकारी वकिलांना कागदपत्रे वेळेत दिले नाहीत. आंदोलन करणाऱ्या लोकांना सांगू इच्छितो की हे सगळे बोलघेवडे लोक आहेत, त्यांना केवळ राजकारण पेटवायचे आहे. आम्ही मराठा आरक्षण देण्यास कटिबद्ध आहोत, असे आश्वासन विखे पाटील दिले.