पुणे : आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी म्हण आहे. मात्र, एका विशेष उपक्रमामुळे आडातील पाणी थेट पोहऱ्यात येणार आहे. दुष्काळाचा सामना करीत असलेल्या रहिमतपूर (जि. सातारा) परिसरातील दहा गावांमधील विहिरी आणि आडांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. गावातील विद्यार्थी उन्हाळी सुटीत सर्वेक्षण करणार असून, त्यानंतर सर्वंकष आराखडा तयार करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला जाणार आहे.

रहिमतपूरचे भूमिपूत्र आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या संकल्पनेतून विहिरी, आड आणि कूपनलिकांचे (बोअरवेल) सर्वेक्षण केले जाणार आहे. डॉ. शेंडे यांची ग्रीन तेर फाउंडेशन आणि श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी यांच्या पुढाकारातून सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.

हेही वाचा…सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांचा प्रचारावर खर्च किती? समोर आली आकडेवारी…

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने राज्याच्या अनेक भागांत तीव्र पाणी टंचाई आहे. सातारा जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. विहीर आणि आड हे पाण्याचे जिवंत, नैसर्गिक स्रोत आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन झाल्यास त्याचा लाभ ग्रामस्थांना, शेतीला, तसेच भूजल पातळी वाढवण्यात होणार आहे. या उद्देशाने संस्थेच्या तीन शाळांमधील नववी आणि दहावीच्या १५० विद्यार्थ्यांची सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. एक मे रोजी शैक्षणिक निकालाच्या दिवशी १० गावांतील विद्यार्थ्यांना सर्वेक्षणासाठी प्रश्नावली देण्यात आली. आपल्याच गावातील विहीर, आड आणि बोअरवेल यांचे सर्वेक्षण त्यांना करावयाचे असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अरुण माने यांनी सांगितले. संबंधित १० गावांमध्ये २०० विहिरी, तर ५० आड असल्याचा अंदाज आहे. घरोघरी जाऊन प्रश्नावलीद्वारे येत्या १५ मेपर्यंत विद्यार्थी सर्वेक्षण पूर्ण करणार असल्याचे शिक्षक शत्रुघ्न मोहिते यांनी सांगितले.

प्रश्नावलीतून समोर येणार जलस्रोतांची वस्तुस्थिती

गावातील कुटुंबांची संख्या, विहिरींची संख्या, छोटे ओहोळ, नाले यांची संख्या व लांबी, ओढे वाहण्याचा सरासरी कालावधी, कार्यरत आड, रहाट नसलेले आड, नदी असल्यास तिचे नाव व स्थिती, गावात पडणारा सरासरी पाऊस, गतवर्षीची पावसाची आकडेवारी, पावसातील तफावत, कुटुंबाच्या मालकीच्या विहिरीची संख्या, बोअरवेलची संख्या, सद्य:स्थिती, विहीर किंवा आड बंद आहे की सुरू, पावसाळ्यातील व आताची पाणी पातळी स्थिती, दुष्काळी स्थितीमुळे पीक पद्धतीतील बदल, पीक उत्पादनात झालेली घट, आर्थिक नुकसान रुपयांमध्ये.

हेही वाचा…आढळराव, कोल्हे यांना निवडणूक प्रशासनाची पुन्हा नोटीस… काय आहे कारण?

असे होणार जलस्रोतांचे पुनरुज्जीवन

सर्वेक्षणाचा विस्तृत अहवाल एक समिती तयार करेल. त्यातून १० गावांमध्ये विहीर, आड आणि बोअरवेल यांची स्थिती काय आहे हे स्पष्ट होईल. त्या आधारे पुढे काय करायचे याचा कृती आराखडा बनवला जाईल. विहिरी जिवंत कशा ठेवायच्या, त्या वापरात कशा राहतील, घराघरांवरील पावसाचे पाणी त्यात कसे सोडता येईल, ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यांची काय आणि कशी मदत घेता येईल, लोकसहभागाद्वारे भूजल पुनर्भरण कसे करता येईल याबाबतची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे.

हेही वाचा…पुणे : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन ज्येष्ठावर तलवारीचे वार

लोकसहभागातून पुनरुज्जीवन

गावातील विहिरी, आड आणि बोअरवेल हे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. ते आपण टिकवायला हवेत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या सर्वेक्षणानंतर, लोकसहभागातून या सर्वांचे पुनरुज्जीवन करू, असे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी सांगितले.