भारतीय स्वातंत्र्य युद्धातील क्रांतिकारकांची व त्यांच्या कार्याविषयी दुर्मीळ छायाचित्रे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. क्रांतिदिनानिमित्त नॅशनल युवा को ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे या छायाचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात ७ ते ९ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
नितीन शास्त्री यांनी संग्रहित केलेली साधारण साडेचारशे छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. १८५७ ते १९४७ या कालावधीत झालेल्या वेगवेगळ्या क्रांतिकारी उठावांची छायाचित्रे या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, चापेकर बंधू, अभिनव भारत मित्र मेळा, युगांतर, अनुशिलन समिती या संघटनांच्या क्रांतिकारकांनी केलेल्या कामगिरीची छायाचित्रे या संग्रहात आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (७ ऑगस्ट) महापौर चंचला कोद्रे आणि इतिहास तज्ज्ञ निनाद बेडेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. ९ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.



