लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : दुचाकीस्वार चोरट्यांनी रिक्षाचालकाला मारहाण करून त्याला लुटल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात घडली. मारहाणीत रिक्षाचालक जखमी झाला असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

युवराज अंबालप्पा भिल्लव (वय २५, रा. धायरी) असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. भिल्लव याने यााबाबत वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुचाकीवरील तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक भिल्लव शुक्रवारी सायंकाळी नवले पुलाजवळ प्रवाशांची वाट पाहत थांबला होता. त्या वेळी दुचाकीवरून तिघे जण तेथे आले. दुचाकीवरील तिघांनी भिल्लव याच्याकडील मोबाइल हिसकावून पळ काढला. रिक्षाचालक भिल्लवने दुचाकीवरुन पसार झालेल्या चोरट्यांचा पाठलाग सुरू केला.

काही अंतरावर दुचाकीवरील चोरट्यांना त्याने थांबविले. चोरट्यानी भिल्लव याच्या उजव्या हातावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. चोरट्यांनी त्याच्या खिशातील पाचशे रुपये काढून घेतले, तसेच रिक्षाची काचही फोडली. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील तपास करत आहेत.