पुणे : कोंढव्यातील खडी मशीन चौकात भरदिवसा गोळीबार करून रिक्षाचालक गणेश काळे याचा खून करण्यात आला. वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात गणेश काळे याच्या भावाला अटक करण्यात आली होती. वनराजच्या खूनाचा सूड उगविण्यासाठी आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा यांच्या सांगण्यावरुन काळे याचा खून करण्यात आल्याची माहिती तपासात मिळाली आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीनांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी कृष्णा आंदेकर (वय २८), बंडू आंदेकर (वय ६९), स्वराज वाडेकर (वय २५, तिघे रा. डोके तालीम चाैक, नाना पेठ), अमीर खान (वय २५), मयूर वाघमारे (वय २३),अमन मेहबुब शेख (वय २३, रा. काकडे वस्ती, कोंढवा), अरबाज अहमद पटेल (वय २४, रा. काकडे वस्ती, कोंढवा) यांच्यासह दोन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अरबाज पटेल आणि अमन शेख यांना अटक केली आहे. दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. याबाबत गणेश काळेचे वडील किसन धोंडिबा काळे (वय ५१, रा. शिवकृपा बिल्डिंग, येवलेवाडी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अमन शेख आणि अरबाज पटेल हे सराइत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. अरबाज पटेल याला काही वर्षांपूर्वी तडीपार करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी त्याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. अकोला कारागृहात तो स्थानबद्ध होता. त्यानंतर तो कारागृहातून बाहेर पडला. गेल्या वर्षी मार्च २०२४ मध्ये तळेगाव दाभाडे येथे चार ठिकाणी गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अमन मेहबुब शेख आणि समर्थ तोरणे यांच्याकडून तीन पिस्तुले आणि चार काडतुसे जप्त केली होती. गणेश काळे खून प्रकरणातील दोन अल्पवयीनांविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणात गणेश काळे याचा भाऊ समीर काळे याला अटक करण्यात आली होती. सध्या तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. गणेश काळे हा रिक्षाचालक आहे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास कोंढव्यातील खडी मशीन चौकाजवळ रिक्षा घेऊन थांबला होता. त्यावेळी पेट्रोल पंपाजवळ थांबलेल्या काळे याच्यावर आरोपी अमन शेख, अरबाज पटेल आणि दोन अल्पवयीनांनी पिस्तुलातून गोळीबार केला. त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार करून खून केला. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त धन्यकुमार गाेडसे, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पसार झालेल्या अरबाज पटेल, अमन शेख यांच्यासह अल्पवयीनांना रात्री ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करत आहेत. काळे याचा खून आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, त्याच मुलगा कृष्णा, नातू स्वराज वाडेकर, साथीदार अमीर खान, मयूर वाघमारे यांच्या सांगणयावरुन झाला असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. आंदेकर टोळीने वनराज आंदेकरच्या खूनाचा सूड उगविण्यासाठी आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा ६ सप्टेबर रोजी नाना पेठेत गोळीबार करून खून केला होता. त्यानंतर आंदेकरसह १६ जणांना अटक करण्यात आली. आंदेकरसह साथीदार सध्या कारागृहात न्यायालयीन काेठडीत आहेत.