हैदराबादहून पुण्यात आलेल्या प्रवाशाकडील रोकड आणि दागिने असा साडेनऊ लाख रुपयांचा ऐवज असलेली बॅग रिक्षात विसरल्याची घटना बुधवारी (२० एप्रिल) घडली. प्रवाशाने दिलेल्या तक्रारीनुसार रिक्षाचालकाचा शोध पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून बॅग परत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मृणाल सुरेंद्र यादव (वय २९, रा. २१७९ मोदीखाना, लष्कर) यांनी या संदर्भात लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मृणाल हे बुधवारी हैद्राबादहून पुण्यात सकाळी आले. त्यांच्यासोबत पत्नी होती. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते पुणे स्टेशन परिसरातील जहाँगीर रुग्णालयाजवळ रिक्षाची वाट पाहत थांबले होते. यादव दाम्पत्याकडे चार बॅग होत्या. त्यापैकी एका बॅगेत सुवर्ण हार, बांगडय़ा, मंगळसूत्र, अंगठय़ा असा ऐवज होता. जहाँगीर रुग्णालयाजवळ ते एका रिक्षात बसले. ऐवज असलेली बॅग त्यांनी रिक्षाच्या मागील बाजूस ठेवली. मोदीखाना येथे यादव दाम्पत्य उतरले. घाईगडबडीत रिक्षातील आसनाच्या मागील बाजूस ठेवलेली बॅग विसरली. रिक्षाचालक तेथून निघून गेल्यानंतर यादव यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
दरम्यान, या घटनेनंतर रिक्षाचालकाने अद्याप बॅग परत न केल्याने पोलिसांनी त्याच्या शोध घेण्यास सुरुवात केली आहे. जहाँगीर रुग्णालय आणि लष्कर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पडतळण्याचे काम करण्यात येत आहे. रिक्षाचालकाचे वय अंदाजे ३५ वर्ष आहे. रिक्षाचे हुड (चामडी आवरण) तपकिरी रंगाचे आहे. यापूर्वी रिक्षा प्रवासात गहाळ झालेल्या बॅग अनेकदा रिक्षाचालकांनी परत केल्या आहेत. मध्यंतरी एका परदेशी महिलेची बॅग नगर रस्त्यावर गहाळ झाली होती. ही बॅग परत न करणाऱ्या रिक्षाचालकाचा शोध घेऊन गुन्हे शाखेतील पोलिसांनी त्याला अटक केली होती.