पिंपरी : पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ठरले असताना महाविकास आघाडीत कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे राहणार, हे चित्र अद्यापही स्पष्ट झाले नाही. एकही उमेदवार ठरला नसून जागांवरून राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे) या पक्षांमध्ये चिंचवड आणि भोसरीवरून रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीतील पेच कायम असल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. मुंबई, पुण्याच्या वाऱ्या सुरू आहेत. तिन्हींपैकी एका मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊन पाच दिवस झाले. परंतु, अद्याप महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले नाहीत. दुसरीकडे महायुतीने उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने पिंपरीतून आमदार अण्णा बनसोडे, भाजपने चिंचवडमधून शंकर जगताप आणि भोसरीतून विद्यमान आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांचा प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यात पिंपरी -चिंचवडमधील एकाही जागेचा समावेश नाही. काँग्रेसला शहरातील एकही मतदारसंघ मिळण्याची शक्यता नाही. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने तिन्ही मतदारसंघावर दावा केला आहे. तर, शिवसेना (ठाकरे) पक्षाचा पिंपरी आणि भोसरीवर दावा आहे.

आणखी वाचा-अजितदादांच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणे काँग्रेस नेत्याला भोवले, सहा वर्षासाठी निलंबन

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष पिंपरी मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. या मतदारसंघातून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा पराभव करण्यासाठी आक्रमक, सक्षम चेहरा द्यावा अशी मागणी समोर आली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) आणि आमदार बनसोडे यांच्यावर नाराज असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गुरुवारी रात्री भेट घेतली. भाजपच्या माजी नगरसेविका, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे दोघींपैंकी उमेदवारी कोणाला द्यायची यावर तोडगा निघाला नाही. चिंचवडमधून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून लढण्यासाठी माजी नगरसेवक राहुल कलाटे इच्छुक आहेत. कलाटे, नाना काटे, चंद्रकांत नखाते यांनी ‘तुम्ही जो उमेदवार द्याल, त्याचे काम करण्याची ग्वाही’ शरद पवार यांना दिली. परंतु, अद्याप जागा कोणत्या पक्षाला सुटणार हे निश्चित झाले नाही.

आणखी वाचा-कल्याणीनगर अपघात प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता

भोसरीच्या जागेवरून महाविकास आघाडीत मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात आलेले अजित गव्हाणे, भाजपमधून शिवसेनेत (ठाकरे) आलेले रवि लांडगे हे इच्छुक आहेत. दोन्ही पक्ष जागा सोडण्यास तयार नाहीत. गव्हाणे यांनी माजी नगरसेवकांची फौज घेत जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. शिवसेना (ठाकरे) भोसरीच्या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे भोसरीवरून तिढा वाढला आहे. चिंचवड शिवसेना (ठाकरे) आणि पिंपरी, भोसरी हे मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला सोडण्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. तोडगा न निघाल्यास तिन्हींपैकी एका मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Story img Loader