scorecardresearch

हळदीच्या दरात तेजी

करोना काळात रोग प्रतिकारक आयुर्वेदिक उपाय म्हणून हळद सेवन करण्याचे प्रमाण वाढले.

पुणे: करोना काळात रोग प्रतिकारक आयुर्वेदिक उपाय म्हणून हळद सेवन करण्याचे प्रमाण वाढले. तोच कल आजअखेर कायम आहे. हळद पावडरची मागणी टिकून राहिल्यामुळे दरात मागील वर्षांच्या तुलनेत वाढ होऊन हा दर प्रतिक्विंटल आठ ते दहा हजार रुपये झाला असून, प्रतिकिलोचा किरकोळ विक्री दर ३१५ ते ३५० रुपये असा झाला आहे.
सांगलीचे हळद पावडर उत्पादक गोपाळ मर्दा म्हणाले, जगभरात सांगलीच्या हळद बाजारपेठेची ओळख आहे. तमिळनाडूवगळता देशभरातून येथे हळद विक्रीसाठी येते. त्या विविध प्रकारच्या जातींची, प्रतींची हळद येथील प्रक्रिया केंद्रांसाठी उपलब्ध होते. हंगामात दररोज लाखभर पोत्यांची विक्री सांगलीत होते. येथे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली हळद प्रामुख्याने प्रकिया उद्योग आणि निर्यातीसाठी वापरली जाते. मागील तीन वर्षांपासून हळदीचे दर स्थिर आहेत. रोग प्रतिकारक शक्ती वाढते म्हणून करोना काळात हळदीच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम म्हणून हळद पावडरला मागणी आहे. तरीही दरात वाढ होत नव्हती, यंदा दरात तेजी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत प्रतिकिलो दहा रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
यंदा सांगली पट्टय़ात हळदीचे उत्पादन सरासरी इतके आहे. पण, मराठवाडय़ात हळदीचे उत्पादन वाढले आहे. मराठवाडय़ातून मोठय़ा प्रमाणावर हळद विक्रीसाठी सांगलीत येत आहे.

सांगलीतून जगभरात पुरवठा
सांगलीत विक्री होणाऱ्या हळदीपैकी पन्नास टक्के हळदीपासून पावडर तयार केली जाते. पावडर तयार करणारे सुमारे साठहून अधिक कारखाने आहेत. रोज सरासरी पाच टन हळद पावडर तयार होते. देशातील गरज भागवून जवळपास दहा टक्के हळद पावडर निर्यात केली जाते. संपूर्ण आखाती देशांसह, ब्रिटन, युरोपातही हळद पावडर निर्यात केली जाते. अखंड हळकुंड आणि हळद पावडरची वार्षिक निर्यात एकूण दहा हजार टनांच्या घरात असून, त्याद्वारे होणारी आर्थिक उलाढाल ३ कोटी २५ लाख डॉलरवर आहे. भारत जगभरात हळदीची निर्यात करतो, हळदीच्या जागतिक निर्यातीत देशाचा वाटा सुमारे ७५ टक्क्यापर्यंत आहे.

मागील वर्षांच्या हळदीचा साठा संपला आहे. त्यामुळे बाजारात नव्याने आलेल्या हळदीच्या दरात तेजी आहे. परिणामी हळद पावडरीच्या दरातही तेजी आहे. सांगलीतून थेट हळद निर्यात होत नाही. मुंबई, अहमदाबाद, इरोड येथील व्यापाऱ्यांना आम्ही हळद पुरवितो, ते हळदीची निर्यात करतात. – गोपाळ मर्दा, हळद पावडर उत्पादक, सांगली

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rise turmeric prices immune ayurvedic during corona period turmeric powder demand amy

ताज्या बातम्या