पुणे : दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करून महिलेवर बलात्कार करणाऱ्या ऋषीकेश वैद्य याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार वैद्य याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करून पुण्यातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी ऋषीकेश श्रीकांत वैद्य (वय ३९, रा. वसई, जि. पालघर) याला अटक करण्यात आली होती. या बाबत एका महिलेने वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. संबंधित गुन्हा पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात तपासासाठी सोपविण्यात आल्यानंतर वैद्यला पोलिसांनी अटक केली होती. वैद्यच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला लष्कर न्यायालायात हजर करण्यात केले. न्यायालयात तपास अधिकाऱ्यांनी तपासाबाबतची माहिती दिली.

‘आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. वैद्यने गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटार जप्त करायची आहे. त्याने महिलेची छायाचित्रे काढली आहेत का? या दृष्टीने तपास करायचा आहे. त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, तसेच अशा पद्धतीने त्याने आणखी काही महिलांची फसवणूक केली आहे का, त्याने प्रसादात गुंगीचे औषध वापरल्याची शक्यतेबाबत दृष्टीने तपास करायचा आहे. वैद्यच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्याची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी,’ अशी विनंती सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केली.

बचाव पक्षातर्फे ॲड. साजिद शाह, ॲड. दिगंबर देसाई, ॲड. पवन कुलकर्णी यांनी विरोध केला. सरकार पक्षातर्फे जुनीच कारणे देण्यात आली असून, आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद त्यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने वैद्यच्या पोलिस कोठडीत चौकशीचा अधिकार अबाधित ठेवून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

‘शेंडी कापू नये’

‘आरोपी वैद्य याच्याकडून ॲड. साजिद शाह, ॲड. दिगंबर देसाई, ॲड. पवन कुलकर्णी यांनी बाजू मांडली. ‘कारागृहात रवानगी केल्यानंतर केस कापले जातात. वैद्य याच्या डोक्यावरील शेंडी ही धार्मिक बाब आहे. त्याची शेंडी कापण्यात येऊ नये,’ अशी विनंती ॲड. शाह यांनी न्यायालयाकडे केली. या बाबत न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला. त्यानंतर न्यायालायने कारागृह प्रशासनला वैद्यची शेंडी कापू नये,’ असे आदेश दिले.