पुणे : एकमेकांकडे बघण्याच्या वादातून अल्पवयीनाला हाॅकी स्टिकने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कोंढव्यात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसिफ हिदायत शेख (वय २४, रा. टेम्पल टाॅवर सोसायटीसमोर, कोंढवा), आवेज इलियास शेख (वय २४, रा. निलेश काॅम्प्लेक्स, मीठानगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका अल्पवयीनाने काेंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन हा २० फेब्रुवारी राेजी रात्री साडेदहाच्या सुमारास मित्राबरोबर गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपी शेख आणि अल्पवयीन मुलाने एकमेकांकडे बघितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपी शेख आणि साथीदारांनी मुलाला शिवीगाळ करुन हाॅकी स्टिकने बेदम मारहाण केली. पसार झालेल्या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे तपास करत आहेत.

विवाह समारंभात ज्येष्ठाकडील दीड लाखांची सोनसाखळी लंपास

विवाह समारंभात ज्येष्ठाच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गु्न्हा दाखल केला.याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे हडपसरमधील भेकराईनगर भागात राहायला आहेत. ते २० फेब्रुवारी रोजी पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडीत असलेल्या एका मंगल कार्यालयात नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी गेले होते. विवाह समारंभ पार पडल्यानंतर ते जेवण करत होते. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची सोनसाखळी लांबविल्याची घटना घडली. या घटनेची महिती मिळाल्यानंतर पोलिासंनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस कर्मचारी शिंदे तपास करत आहेत.

विवाह समांबात दागिने चोरून नेण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन परिसरातील मंगल कार्यालय, तसेच लोणी काळभोरमधील मंगल कार्यालयातून दागिने चोरुन नेण्याच्या घटना घडल्या. विवाह समारंभात दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढल्या असून, पोलिसांनी दागिने सांभाळून ठेवावेत, असे आवाहन केले आहे.